नवी दिल्ली । हिरे व दागिन्यांसह रत्नांची निर्यात करण्यासाठी सध्याचा काळ योग्य आहे, असे जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष प्रवीणशंकर पंड्या यांनी सांगितले आहे. राजधानीत झालेल्या एका कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. हा उद्योग मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा असल्याचे सांगून पंड्या म्हणाले की, सरकारच्या वतीने सध्या आकारले जाणारे 12 टक्के सीमा शुल्क कमी केल्यास या उद्योगासाठी फायदा होईल. भारतात सीमा शुल्क अधिक असल्यामुळे अनेकजण दागदागिने दुबईतून खरेदी करतात. यामुळे देशाचे लाखो रुपयांचे परकीय चलन बुडते.
जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने काही उद्दिष्टे ठरवली आहेत, या उद्दिष्टांमध्ये दागिन्यांच्या निर्यातीला चालना देणे, रोजगाराची निर्मिती करणे, दागिने उद्योगात मूल्यवर्धन करणे यांचा समावेश करण्यात आला आहे. या उद्योगात येण्यासाठी अनेक तरुण उत्सुक असून, या क्षेत्रात चांगला पैसा मिळू शकतो. यासाठी जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाला पूरक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. म्हणून या विषयाचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची तयारी कौन्सिलने सुरू केली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने नवी मुंबईत जागू देऊ, असे आश्वासनही दिल्याचे पंड्या यांनी सांगितले.
हिर्यांना पैलू पाडण्याच्या व्यवसायात भारताने जगभरात नाव कमावले आहे. या हिर्यांची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही निर्यात 10 टक्क्यांनी वाढल्यास एक लाख रोजगार वाढतात. या क्षेत्रात 12 लाख लोक काम करत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र रोजगार देणारे क्षेत्र आहे. मात्र, सध्या कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर उणीव आहे. जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आज भारताकडे आहे. परंतु, केवळ कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे आपण मागे पडतो, अशी खंतही प्रवीणशंकर पंड्या यांनी व्यक्त केली.