औरंगाबाद : औरंगाबादमध्ये भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केली. औरंगाबादमधील शहरातील सुभेदारी गेस्ट हाऊसवर गायकवाड हे पत्नीसह आले होते. कार्यकर्त्यांनी त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी 4 पुरूष व 2 महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. अमित भुईगळ, दिनेश साळवे, श्रीरंग ससाणे, गौतम गवळी, शांताबाई घुले, रेखा उजागरे अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आंबेडकर भवन का पाडले?
भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ हे 15 ते 20 कार्यकर्त्यांबरोबर गेस्ट हाऊसजवळ आले आणि त्यांनी रत्नाकर गायकवाड यांना घेराव घालून बाबासाहेब आंबेडकर भवन का पाडले? अशी विचारणा केली. त्यावर तुम्ही कोण विचारणारे, असा प्रश्न गायकवाड यांनी केला. आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत असे उत्तर या कार्यकर्त्यांनी दिल्यावर गायकवाड यांनी सुरक्षारक्षकांना त्यांना बाहेर काढण्याची सूचना केली. त्यानंतर 5-6 जणांनी गायकवाड यांना मारहाण सुरू केली. या वेळी त्यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. मारहाण करणार्यांमध्ये महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
पोलिसांना कल्पना होती
मुंबईतील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ रत्नाकर गायकवाड यांना ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. आंबेडकर भवन पाडण्याचा अहवाल गायकवाड यांनी दिला होता, असा भारिप-बहुजन महासंघाचा आरोप आहे. याच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाकडून गायकवाड यांना सुभेदारी गेस्ट हाऊस येथे घेराव घालण्यात येणार होता. गायकवाड यांना घेराव घालणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे आधीच तेथे पोलिस उपस्थित होते.
ही दुर्दैवी घटना
आंबेडकर भवन पाडल्याचा जनतेमध्ये राग आहे. परंतु रत्नाकर गायकवाड यांच्यावरील हल्ला ही दुर्दैवी घटना आहे.
-आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन सेना.