रत्नागिरीत पालिकेच्या निम्म्या शाळांची अवस्था बिकट

0

रत्नागिरी । पालिकेच्या 21 शाळांपैकी निम्म्या शाळांच्या इमारतींची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळे पावसापूर्वी या शाळांची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी, असे आदेश नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी शिक्षण विभागाला पालिकेच्या आजच्या विशेष सभेत दिले. शहरात पाणीटंचाई असून, पाणी पुरवठ्यासाठी वारंवार मागे लागल्यानंतरच पाण्याचा टँकर चार दिवसांनी मिळतो. इतर लोकांकडे मात्र वारंवार जातो. त्याचे नियोजन करावे, अशी मागणी नगरसेवक मुसा काझी यांनी या सभेत केली.

विविध सोळा विषयांवर चर्चा
विषयपत्रिकेवर ठेवण्यात आलेल्या सोळा विषयांवर चर्चा झाली. अनेक विषय सर्वांनुमते मंजूर करण्यात आले. काही विषयांबाबत विरोधकांनी तांत्रिक गोष्टी पूर्ण करून तो मंजूर करावा, असे स्पष्ट केले. राजिवडा येथील आरक्षण क्र. 72 हे बालोद्यानासाठी आरक्षित आहे. आरक्षण क्र. 74 हे बाजार केंद्रासाठी आरक्षित आहे. ही आरक्षणे विकसित करण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक सोहेल मुकादम यांनी केली. त्यावर विरोधक नगरसेवक सुदेश मयेकर म्हणाले, या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ती विकसित करा.