रत्नागिरी : कोकणात मोसमी पाऊस स्थिरावल्याची चिन्हे असून, पावसाचा जोर सोमवारी मध्यरात्री वाढला होता. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 86 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात पडला असून, चोवीस तासांत 149 मिलिमीटर एवढा पाऊस झाला. त्याखालोखाल चिपळूण येथे 136 मिलिमीटर पाऊस पडला आहे. दापोलीत 113, मंडणगड -91, गुहागर -68, तर राजापूर- 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाऊस सुरू झाल्यापासून आतापर्यंत 599 मिलिमीटर पाऊस झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाहतूक पाच तास ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा माजळ (ता. लांजा) रस्त्यावर झाडे कोसळल्याने तेेथील वाहतूक पाच तास बंद होती. अखेर ग्रामस्थांनी झाड बाजूला करून ही वाहतूक सुरळीत केली. मात्र, माजळ, जावडे, कोंड्ये आणि रावरी या गावांचा संपर्क तुटला होता. झाड पडल्याने शाळेत जाणार्या मुलांचे अतोनात हाल झाले, तर जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये 5 तास वाहतूक ठप्प झाली. यामुळे काही ठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.