मुंबई | राज्यात सहा ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा शासनाचा मानस होता. मात्र रत्नागिरी व सोलापूर येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार येथील शासकीय तंत्रनिकेतन बंद करणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. सदस्य प्रणिती शिंदे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमानुसार एकाच परिसरात तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय देता येत नाही. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ही विद्यार्थ्यांची गरज आहे. खासगी महाविद्यालयातील शुल्क विद्यार्थ्यांना परवडत नाही म्हणून राज्यात सहा ठिकाणी तंत्रनिकेतनाऐवजी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात येणार होते. मात्र लोकप्रतिनिधींच्या भावना लक्षात घेता या दोन ठिकाणची तंत्रनिकेतन बंद होणार नाही. या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनील देशमुख, गणपत देशमुख, भारत भालके, राहुल कुल, राजेश टोपे यांनी सहभाग घेतला.