पुणे । फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्या आणि जगभरात प्रसिध्द असणार्या रत्नागिरी हापुस पुणे बाजारपेठेत दाखल झाला असून पुणेकरांची रत्नागीरी हापुसची प्रतिक्षा आता संपली आहे. रत्नागिरी हापूसची पहिली पेटी रविवारी मार्केटयार्डात दाखल झाली असून पाच डझनाच्या पेटीस तब्बल 11 हजार रुपयांचा भाव मिळाला.रत्नागिरीतील करंदीकर वाडीतील शेतकरी नितीन करंदीकर यांच्या बागेतून मार्केटयार्डातील आडते शिवलाल भोसले यांच्या गाळ्यावर पेटी दाखल झाली. रावसाहेब कुंजरी यांनी ती तब्बल 11 हजार रुपयांना खरेदी केली. गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल 20 दिवस उशीरा रत्नागिरी हापूसची आवक झाली आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत दरही पेटीमागे तब्बल साडेतीन हजार रुपयांनी जास्त मिळाला आहे. पुढील आठवड्यापासून रत्नागिरी हापूसची बाजारात तुरळक आवक सुरू होईल. मात्र, 25 फेबु्रवारीनंतर मात्र नियमितपणे आवक होईल.
वादळामुळे नुकसान
यंदा दिवाळीनंतर आलेल्या ओखी वादळामुळे आंब्याचे यंदा नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन तुलनेने कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातील आंब्याला चांगले भाव मिळतील, अशी शक्यता आडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवलाल भोसले यांनी व्यक्त केली.
उत्पादनात घट
यंदा मोठ्या प्रमाणातं थंडी आहे. त्यामुळे पहिला मोहोर गळून गेला असून त्यातून दुसरा मोहोर फुटत ओह. त्यामुळे फळधारणा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे यंदा उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे.
– नितीन करंदीकर, हापुस उत्पादक