रत्नागिरी हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात; 15 दिवसच आवक

0

पुणे । रत्नागिरी हापूसचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. आणखी 15 दिवस रत्नागिरी हापूसची चव चाखायला मिळणार आहे. तर कर्नाटक हापूसचा हंगाम आणखी एक महिना चालणार आहे. दोन्ही हापूसच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे 20 टक्क्यांनी घट झाली आहे. आंबा पूर्णपणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. आंबा खाण्याची हीच वेळ असल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

रविवारी मार्केट यार्डातील फळ विभागात सुमारे साडेसात हजार पेटी रत्नागिरी हापूसची आवक झाली. याविषयी रत्नागिरी हापूसचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, रत्नागिरी हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हळूहळू आंब्याची आवक कमी होण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या आठवड्यात सुमारे 10 हजार पेटी आवक झाली होती. ती आता साडेसात हजारापर्यंत कमी झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आंब्याच्या भावात सुमारे 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे. यापेक्षा आंबा स्वस्त होण्याची शक्यता नाही. नागरिकांनी आंबा खाण्याची हीच योग्य वेळ आहे.

तर कर्नाटक हापूसची बाजारात 20 हजार पेटी आवक झाली. ही आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी आहे. याविषयी कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, मागील आठवड्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूकांसाठी मतदान झाले. निवडणूकीमुळे कर्नाटक हापूसची आवक कमी झाली. गेल्या आठवड्यात सुमारे 50 हजार पेटी आवक झाली होती.

केशर हापूसची आवक सुरू
सातारा, महाबळेश्‍वर आणि वाई परिसरातून केशर आंब्याची आवक सुरु झाली आहे. रविवारी मार्केटयार्डात 200 ते 250 के्रट इतकी आवक झाली़ दरम्यान पुणे जिल्ह्यातील स्थानिक केशर आंब्याची आवक तुरळक सुरु झाली आहे़ महाबळेश्‍वर परिसरातील केशर आंब्याची आवक आणखी एक महिना सुरु राहणार असून सध्या प्रतिकिलोस 40 ते 60 रुपये भाव मिळत असल्याची माहिती आंब्याचे व्यापारी संतोष ओसवाल यांनी सांगितले़ येत्या काही दिवसांत स्थानिक केशर आणि त्यानंतर गुजरात केशर आंब्याची आवक सुरू होईल़