रनओव्हरमध्ये मृत्यू झाल्यास ट्रॅकमॅनला शहीद घोषित करावे

0

मध्य रेल्वे विभागीय कार्यशाळेत आरकेटीए संघटनेची मागणी

भुसावळ- रनओव्हरदरम्यान ट्रॅकमनचा मृत्यू ओढवल्यास त्यास शहीदाचा दर्जा द्यावा तसेच परीवारातील वारसाला सैनिकांच्या परीवारास मिळणार्‍या सुविधांप्रमाणे सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी आरकेटीए संघटनेतर्फे येथे करण्यात आली. रेल्वेच्या आरकेटीए संघटनेतर्फे ट्रॅकमन कर्मचार्‍यांसाठी सुरक्षा कार्यशाळा श्रीकृष्णचंद्र सभागृहात नुकतीच झाली. याप्रसंगी संघटनेच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्या डीआरएम यादव यांच्याकडे सादर केल्या.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर डिआरएम आर.के.यादव, सिनीअर डिइएन चिखले, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व्ही.रवी, राष्ट्रीय महामंत्री जी.गणेश्‍वर राव, विभागीय अध्यक्ष नितीन बलखंडे, विभागीय सचिव रामशंकर प्रसाद, अनुप गुप्ता, प्रकाश जाधव, मुकेश वर्मा, रामजीवन मालविय, उपाध्यक्ष धिरज आगलावे, नितीन सोनार, चाँद खाँ, कन्हैया सातनकर, विजय खुले, रहिम तडवी, गणेश नवथळे आदी उपस्थित होते.

तर ट्रॅकमनला शहीद घोषित करावे
रेल्वे ट्रॅकमन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रात्रं-दिवस रेल्वे पट्ट्यावर काम करीत असतो शिवाय हे काम अतिशय जोखीमेचे आहे. यात आतापर्यंत अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे आता ट्रॅकमनचा रनओव्हरदरम्यान मृत्यू झाल्यास त्यास शहीदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी प्रसंगी करण्यात आली. प्रवाशांची सुरक्षेची काळजी घेत असताना आपल्याही सुरक्षेची खबरदारी घ्या, योग्य प्रशिक्षण घेऊन काम केल्यास दुर्घटना टळू शकत असल्याचे डिआरएम आर.के. यादव यांनी सांगितले. प्रकाश जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

विविध मागण्यांबाबत डीआरएम यांना निवेदन
एलडीसीई सर्वांसाठी खुले करण्यात यावे, बेसिक 30 टक्के जोखीम भत्ता द्यावा, ट्रॅकमनची कामाचे वेळ 12 तासांऐवजी आठ तास करावी, ट्रॅकमनला 10 हजार रुपये गणवेश भत्ता द्यावा, कामादरम्यान रनओव्हर ट्रॅकमनला शहीदाचा दर्जा मिळावा, त्याच्या परीवारातील वारसाला सैनिकांच्या परिवारास मिळणार्‍या सर्व सुविधा देण्यात याव्या, दुषीत वातावरणात काम केल्यामुळे ट्रॅकमनला संक्रमण भत्ता द्यावा, जीडीसीइ/एलडीसीइ आणि 10-40 टक्के इंटेक कोटा भर्ती प्रत्येक विभागात नियमित करावी, ट्रॅकमनच्या आई-वडिलांना रुग्णालय तसेच पासची सुविधा देण्यात यावी आदी मागण्यांबात जी. गणेशराव यांनी यावेळी डिआरएम यादव यांच्याशी चर्चा करीत निवेदन दिले.