निरामय आरोग्यासाठी 5 जानेवारीला धावणार भुसावळकर : 2200 स्पर्धकांनी केली नोंदणी
भुसावळ : निरामय व सृदृढ आरोग्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेला भुसावळकरांकडून यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत दोन हजार 200 स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी येथे दिली. शहरातील प्रभाकर हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धकांसाठी बनवण्यात आलेल्या टी शर्टचे प्रसंगी लॉचिंग करण्यात आले. याप्रसंगी उपअधीक्षक राठोड म्हणाले की, 5 जानेवारी रोजी भुसावळातील डी.एस.ग्राऊंड (डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगण) येथून तीन गटात स्पर्धेला मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ होईल तत्पूर्वी 4 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 5 दरम्यान शहरातील संतोषी माता हॉलमध्ये नाव नोंदलेल्यांना स्पर्धकांना टी शर्ट व कीटचे वाटप करण्यात येईल.
तीन गटातील स्पर्धेसाठी असा आहे मार्ग
तीन किलो मीटर अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड पासून युटर्न घेऊन पुन्हा डॉ. आंबेडकर मैदान तर पाच किलोमीटर अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डीएस ग्राऊंड) पासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड, हॉटेल हेवन पासून युटर्न घेत पुन्हा मैदान तर 10 किलोमीटर अंतरासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून लोखंडी पूल, अष्टभुजा देवी मंदिर, नवशक्ती आर्केड, हॉटेल हेवनपासून युटर्न घेत वसंत टॉकीज रिक्षा थांबा, दोन नंबरचा पेट्रोल पंपाजवळील डाव्या बाजूला वळत सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, कोनार्क हॉस्पीटल, वाय पॉइंटपासून युटर्न घेत पुन्हा डी.एस.ग्राऊंड असा स्पर्धेचा मार्ग राहणार आहे. 10 किलोमीटर अंतरातील स्पर्धकांनी 5 जानेवारी रोजी पहाटे 5.15 वाजता उपस्थित रहावे तसेच सहा वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल तसेच 5 किलोमीटर अंतरातील स्पर्धकांनी पहाटे 5.40 वाजता उपस्थित रहावे व 6.20 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार असून 3 किलोमीटर अंतरासाठी 6.15 ला उपस्थित राहिल्यानंतर सात वाजता स्पर्धेला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरूवात होईल, असे उपअधीक्षक राठोड म्हणाले.
या मान्यवरांची स्पर्धेसाठी राहणार उपस्थिती
स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाके, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, ऑर्डनन्स फॅक्टरीचे जी.एम., आमदार संजय सावकारे, सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन कुंदन ढाके, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, दीपनगरचे अधिकारी, डीआरएम विवेककुमार गुप्ता, नगराध्यक्ष रमण भोळे, पालिका मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
पत्रकार परीषदेला यांची होती उपस्थिती
प्रभाकर हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परीषदेला विकास पाचपांडे, अजय भोळे, जनशक्तीचे संचालक यतीन ढाके, शुभम महाजन, वरुण इंगळे, प्रवीण फालक, मनीष नेमाडे, क्रीडा शिक्षक रमण भोळे, प्रवीण वारके, अॅड.तुषार पाटील, प्रवीण पाटील आदींची उपस्थिती होती.
खड्ड्यांपासून मुक्तीसाठी पाठपुरावा
भुसावळ शहरातील वर्दळीच्या सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली असून स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांची किमान डागडूजी करण्यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच ही समस्या सुटणार असल्याचा आशावादही पोलिस उपअधीक्षक राठोड यांनी वर्तवला.