सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन कुंदन ढाके यांनीही नोंदणी करून वाढवला स्पर्धकांचा उत्साह
भुसावळ- जिल्हा पोलिस दल व सिद्धीविनायक ग्रुप, आमदार संजय सावकारे, बियाणी स्कूल व गोदावरी फाऊंडेशनच्या विद्यमाने सलग दुसर्या वर्षी होत असलेल्या ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेसाठी आतापर्यंत एक हजार 50 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे तर या स्पर्धेत सहभागासाठी 2 जानेवारीपर्यंत नोंदणीची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली. शनिवारी या स्पर्धेसाठी सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन कुंदन ढाके यांनीही नोंदणी करून स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
निरोगी आरोग्यासाठी धावणे गरजेचे -कुंदन ढाके
निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकाने धावणे गरजेचे आहे. केवळ स्पर्धेच्या दिवशीच न धावता वर्षभर नित्यनियमाने धावल्यास शरीर निरोगी राहून अनेक व्याधी दूर होतात, असे सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन कुंदन ढाके म्हणाले. भुसावळकरांनी या माध्यमातून रन क्लबची स्थापना करावी तसेच भुसावळ शहरात होत असलेल्या ‘रन भुसावळ रन’ या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरीकांना सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अनेकांचा सहभाग, तुम्हीही व्हा सहभागी
‘रन भुसावळ रन’ या स्पर्धेसाठी आमदार संजय सावकारे, डीवायएसपी गजानप राठोड, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्यासह अनेकांनी नाव नोंदणी केली असून आतापर्यंत एक हजार 50 स्पर्धकांची नाव नोंदणी पूर्ण झाली आहे. एकूण एक हजार 500 स्पर्धकांनाच प्रवेश देण्यात येणार असून नाव नोंदणीसाठी शहर पोलिस ठाणे तसेच बाजारपेठ पोलिस ठाण्याबाहेरील स्टॉलवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी 2 जानेवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली असून 13 जानेवारी रोजी शहरातील डी.एस.ग्राऊंडपासून स्पर्धेला शुभारंभ होईल.