‘रन भुसावळ’ स्पर्धेच्या टी शर्टचे लाँचिंग

0

शनिवारी स्पर्धकांना कीटचे होणार वाटप

भुसावळ : रन भुसावळ रन मॅरेथॉनसाठी पोलीस प्रशासनातर्फे एक हजार 250 स्पर्धकांची नावनोंदणी केली असून या स्पर्धेत सहभागी होणार्‍या स्पर्धकांना शनिवार, 7 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी पाच यावेळेत टी-शर्ट आणि मॅरेथॉन कीट वितरीत केले जाणार आहे तर स्पर्धकांसाठी बनवण्यात आलेल्या टी शर्टचे गुरुवारी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत लॉचिंग करण्यात आले. याप्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, समितीचे सदस्य यतीन ढाके, अजय भोळे, विकास पाचपांडे, मनोज पिंपळे, शुभम महाजन, मनीष नेमाडे, क्रीडा शिक्षक रमण भोळे, रवी निमाणी, समीर पाटील, अनिल आर.चौधरी, वरुण इंगळे, शिशिर जावळे यांची उपस्थिती होती.

रविवारी शहरात मॅरेथॉन स्पर्धा
रविवार, 8 रोजी शहरात मॅरेथॉन स्पर्धा होत असून डी.एस.ग्राऊंडपासून स्पर्धेला सुरुवात करण्यात येणार आहे. मॅरेथॉन स्पर्धेसाठी एक हजार स्पर्धकांच्या नोंदणीचे उद्दिष्ट होते मात्र प्रत्यक्षात भुसावळातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने एक हजार 250 स्पर्धकांनी नोंदणी केली.

शनिवारी स्पर्धकांना टी-शर्ट सह कीटचे वाटप
स्पर्धेत सहभागी असलेल्या स्पर्धकांनी टी शर्ट व कीटसाठी शनिवार, 7 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी पाच यावेळेत डी.एस.हायस्कूल मैदानासमोरील मंगलम हॉलमध्ये संपर्क साधावा तसेच येताना मूळ पावती सोबत आणणे गरजेचे असल्याचे आयोजकांनी कळवले आहे. मूळ पावतीशिवाय साहित्य दिले जाणार नाही, असेही कळवण्यात आले आहे. स्पर्धेसाठी सिद्धीविनायक ग्रुप व आमदार संजय सावकारे यांचे सहकार्य लाभत आहे.