न्यूयॉर्क । स्पेनच्या रफाल नदालनेअमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नदालने अर्जंटिनाच्या जुआन मार्टिन डेलपोत्रोवर 4-6, 6-0, 6-3 आणि 6-2 अशा चार सेटमध्ये विजय मिळवला. याआधी दोन वेळा अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावणार्या रफाल नदालची अंतिम फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केविन एंडरसनशी गाठ पडणार आहे. रविवारी हा अंतिम सामना रंगणार आहे. उपांत्य फेरीत डेल पोत्रो थकलेला वाटत होता.पहिला सेट जिंकल्यानंतर पुढच्या सामन्यात थकव्याने त्याच्यावर पूर्णपणे अंमल बसवला होता.त्यामुळे नदालच्या आक्रमक फटक्यांना तोंड देणे पोत्रोला जड जात होते. नदालने सामन्यात 45 विनर लगावले आणि 20 वेळा सहज चुका केल्या.
दुसरीकडे पोत्रोने केवळ 23 विनर मारले आणि तब्बल 40 वेळा चुका केल्या. डेल पोत्रोनं उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडररला मात दिली होती आणि यापूर्वी 2009 मध्येही त्याने नदाल व फेडरर यांना लागोपाठच्या सामन्यात हरवून यूएस ओपनचे जेतेपद पटकावले होते. नदालने 2009 मधील सामन्यात पराभवाचे पुरेपूर उट्टे काढले. रविवारच्या अंतिम लढतीत नदालला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
सानिया- पेंगचा पराभव
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची चीनी जोडीदार शुई पेंग यांचे अमेरिकन ओपनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्य फेरीमध्ये सानिया-पेंग जोडीला स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस आणि चीन तैपेईच्या युंग चान जोडीकडून 4-6, 4-6 या दोन सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही सेटमध्ये सानिया-पेंग जोडीने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र ही आघाडी त्यांना शेवटपर्यंत टिकवता आली नाही. पहिल्या सेटमध्ये सानिया-पेंगने 3-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, हिंगीस-चानने डबल ब्रेकच्या मदतीने 3-3 अशी बरोबरी साधली. त्यानंतर पुढील तीनही पॉईंट जिंकत 6-4 ने सेट आपल्या नावे केला. दुसर्या सेटमध्येही सानिया-पेंगला 3-1 अशी आघाडी मिळाली होती. मात्र ही आघाडी त्यांनी गमावली आणि दुसर्या सेटमध्येही त्यांचा पराभव झाला.