न्यूयॉर्क । जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या रफाल नदालने अंतिम सामन्ुयात दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनचा 6-3,6-3, 6-4 असा सहाज पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीचे विजेतेपद मिळवले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच नदालने आपला रंग दाखवायला सुरूवात केली होती. संपूर्ण सामन्यात नदालने आपल्या प्रतिस्पर्ध्याला डोईजड होण्याची एकही संधी मिळू दिली नाही.या सामन्यात नदालने पूर्ण सामन्यात अँडरसनला एकही ब्रेक पॉइंट मिळू दिला नाही. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील नदालचा हा चौथा अंतिम सामना होता आणि हे या स्पर्धेतील त्याचे तिसरे विजेतेपद आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्याचा या स्पर्धेतील अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचशी सामना झाला नाही. टेनिस कारकिर्दीतले नदालचे हे 16 वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे. नदालने याआधी 2010 आणि 2013 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. जून महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत नदालने बाजी मारली होती. तब्बल चार वर्षांनंतर नदालने एकाच वर्षात दोन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. नदालचे हे वर्षातले पाचवे आणि कट्टर हाडवैरी आणि तेवढाच जवळचा मित्र असलेल्या रॉजर फेडररच्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांशी बरोबरी करण्यासाठी नदालला अजून तीन विजेतेपदांची आवश्यकता आहे. फेडररने 19 ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
विजेतेपद मिळवल्यानंतर नदाल म्हणाला की, यावर्षी जे काही घडलेय ते अविश्वसनीय आहे. अनेक वर्षे अडचणींचा सामना केल्यावर चांगला सूर गवसला. न्यूयॉर्कमध्ये गॅ्रण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्याचा आनंद वाटतो. अमेरिकन ओपन स्पर्धेत खेळणे म्हणजे घरी खेळल्यासारखे आहे. अँडरसन व मी समवयस्क आहोत. नेहमीच कोर्टवर खेळत असलेला पाहत आलो आहे.
अँंडरसनसाठी निराशाजनक दिवस
न्यूयॉर्कमधील कालचा रविवार केविन अँडरसनसाठी खूपच निराशाजनक ठरला. जागतिक क्रमवारीत 32 व्या क्रमांकावर असलेल्या अँंडरसनने 34 व्या प्रयत्नात पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. 1965 मध्ये क्लिफ ड्रिसडेल अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला टेनिसपटू ठरला. त्यानंतर 1981 मध्ये जोहान क्रिकने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून देशाचा पुहिला ग्रॅण्डस्लॅम विजेता ठरण्याचे प्रयत्न केले होते. यावेळी केविन एंडरसनने आपल्या देशावासीयांच्या आशा उंचावल्या होत्या. पण नदालसारख्या प्रतिस्पर्ध्यासमोर त्याचा निभाव लागला नाही.