रब्बीच्या उत्पादनात यंदा 25 टक्क्याने वाढ

0

जलयुक्त शिवारमुळे पिकांची उत्पादन क्षमता वाढली

बारामती :- बारामती तालुक्यातील जिरायती तसेच बागायती भागातील रब्बीचा हंगाम अंतिम टप्यात आहे. अनेक पिकांची कढणी झाली असून उशिरा पेर झालेल्या पिकांची कढणी अंतिम टप्प्यात आहे. तालुक्यातील गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या उत्पादनात सरासरीपेक्षा 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांची उत्पादन क्षमता वाढली आहे.

कांदा पिकाचे भरघोस उत्पादन
हरबरा तसेच मक्क्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. कांद्याचे भरघोस उत्पादानामुळे जिरायत भागातील काही गावांनी कोटींची उड्डाणे घेतली आहेत.बारामती तालुक्यात 4 हजार 600 हेक्टरवर काद्यांच्या पिकांची लागवड करण्यात आली होती त्यात जिरायत भागात सर्वाधिक लागवड होती. कांद्याला मिळालेल्या बाजारभावामुळे या भागातील शेतकरी कधी नव्हे ते लखापती बनलेपुणे तसेच बेळगावच्या कांद्या बाजारपेठेत कांदा विकाला गेला त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना यंदा कांद्याने आर्थिक आधार दिला असे शेतकरी सचिन गडदे व प्रल्हाद कोळेकर यांनी सांगीतले.

ज्वारी व कांदा पिक मोठ्या प्रमाणात
तालुक्याचा निम्मा भाग कायमस्वरुपी दुष्काळी आहे, असे असले तरी रब्बीचा हंगाम हा या तालुक्यातील पिकांसाठी शाश्‍वत हंगाम मानला जातो. त्यामुळे पावसावर अवलंबुन असलेल्या या हंगामात जास्तीत उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू असते. ज्वारी, गहू, हरभरा, मका, ऊस तसेच भाजीपाला ही प्रमुख पिके या हंगामात घेतली जातात. त्याचे नियोजन केले जाते. पावसावर अवलंबून असलेल्या जिरातय भागात ज्वारी तसेच कांदा पिकाचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिरायती भागात देखील सरसरीच्या तुलनेत उत्पादनात वाढ झाली आहे.तालुक्यातील 95 टक्के ज्वारीची काढणी पूर्ण झाली आहे. जिरायती भागात केवळ पावसावर अवलंबून असलेल्या ज्वारीचे हेक्टरी उत्पादन 4 ते 9 क्विंटल पर्यंत गेले आहे.

बागायती भागातील उत्पादन वाढले
नीरा डाव्या कालव्यावर अवलंबुन असलेल्या बागायती भागातील हेक्टरी उत्पादन 16 ते 27 क्विंटलपर्यंत मिळाले आहे. हरबर्‍याच्या उत्पादनात वाढ झाली असून हेक्टरी उत्पादन 17 ते 20 क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरलेल्या मक्क्याचे उत्पादन देखील हेक्टरी 35 ते 40 क्विंटलपर्यंत निघाले आहे. भाजीपाल्याच्या क्षेत्रात सरसरी 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये त्याची उपलब्धता वाढली आहे. परिणामी भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. उसामध्ये केलेल्या आंतरपिकांचे देखील उत्पादन वाढले असून त्यात हरबरा, मका या पिकांचा समावेश आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शाने वाढ
कृषी विभागामार्फत ज्वारी, हरबरा या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये ज्वारीच्या पिकासाठी 605 हेक्टर क्षेत्रावर 60 प्रकल्प राबविण्यात आले. हरबरा पिकासाठी 210 हेक्टर क्षेत्रावर 21 प्रत्यक्षिके व प्रकल्प राबविण्यात आले. शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मदत करण्यात आली. महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाच्या वतीने बियाणे व त्यावरील अनुदान देण्यात आले. तांत्रिक उत्पादन वाढीच्या सुत्रानुसार शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मार्गदर्शन केल्यामुळे उत्पादन क्षमता वाढली, असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.