पुणे : रब्बी हंगामातील पिकांसाठी खडकवासला धरण साखळीतून पाणी सुटणार की नाही, याबाबत चिंता लागून असलेल्या शेतकर्यांना पाटबंधारे खात्याने मोठा दिलासा दिला आहे. तीन टीएमसी पाण्याचे दोन आर्वतने सोडली जाणार असून, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पहिले आवर्तन पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकार्यांच्या माहितीनुसार, 10 तारखेपासून 300 क्युसेस वेगाने पाणी सोडले जात असून, पुढील आठवड्यापर्यंत पहिले आवर्तन सरासरी 1300 क्युसेसने दिले जाईल. यावर्षी रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात तसा विलंबच झाला असल्याची कबुलीही या अधिकार्याने दिली. खरिप हंगाम पाण्याअभावी अडचणीत आल्यानंतर आता रब्बी हंगामाकडून शेतकर्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
यंदा उशिरा आवर्तन सोडले
रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात विलंब लावून पाटबंधारे खात्याने सरासरी एक टीएमसी पाणी वाचविल्याचे सांगितले असले तरी, त्यामुळे रब्बी पिकांचे मात्र मोठे नुकसान झालेले आहे. खडकवासला धरण साखळीतून दरवर्षी रब्बी हंगामासाठी दीर्घ कालावधीचे दोन आवर्तने सोडली जातात. तर उन्हाळी पिकांसाठी दोन आवर्तने सोडण्याची परंपरा आहे. उशिरा आलेला पाऊस आणि ग्रामीण भागात पुरेसा असलेला पाणीसाठा पाहाता, यंदा प्रथमच उशिरा आवर्तन सोडले जात आहे. नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकीतही ग्रामीण भागातील आमदारांनी डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यापासून पाण्याची गरज भासेल, असे अनुमान व्यक्त केले होते. त्यामुळेही पाणी सोडण्यास उशीर झाल्याची माहिती अधिकारी सूत्राने दिली. दरम्यान, धरण साखळीत सद्या 24.35 टीएमसी पाणी असून, गतवर्षीपेक्षा ते एक टीएमसी जास्त आहे. त्यामुळे तीन टीएमसी पाण्याचे दोन आवर्तन सोडले जातील, तसेच पुणे शहराची तहानही पुढील पावसाळ्यापर्यंत भागविली जाईल, असेही सांगण्यात आले. टेमघर व पानशेत धरणाच्या जलसाठ्यात घट झाल्याची माहितीही अधिकारी सूत्राने दिली.
पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम नाही
रब्बी हंगामासाठी सोडले जात असलेल्या पाण्याचा शहराच्या पाणी पुरवठ्यावर काहीही परिणाम होणार नाही, अशी माहितीही पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांनी दिली. शहरासाठी वार्षिक 15 टीएमसी पाणी लागते. तर 14 टीएमसी पाणी ग्रामीण भाग, औद्योगिक क्षेत्र व खेडे भागासाठी राखीव ठेवण्यात येत असतो. खडकवासलासह इतरही धरणांत मुबलक जलसाठा असल्याने पाण्याची चणचण भासणार नाही, अशी माहितीही अधिकारीवर्गाने दिली आहे.
विविध धरणांतील जलसाठा
– पानशेत : 10.65 टीएमसी/100%
– वारसगाव : 12.13 टीएमसी/94.61
– टेमघर : 0.05 टीएमसी/1.39
– एकूण : 24.35 टीएमसी/83.53%