रमजानच्या रोजांसोबत इफ्तार पार्टीतून समाजापुढे आदर्श पायंडा

0

निंभोर्‍याच्या ठाकरे दाम्पत्याच्या उपक्रमाचे समाजमनातून कौतुक

रावेर- मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना,
हिंदी है हम वतन है हिन्दोस्ता हमारा

उर्दू कवी आलम इकबाल यांच्या गाजलेल्या या काव्यपंक्तींना साजेसे कार्य तालुक्यातील निंभोरा येथील ठाकरे दाम्पत्याने करीत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. तब्बल 20 वर्षांपासून पवित्र रमजान महिन्याचे रोजे करण्यासोबतच हिंदू-मुस्लीम एकता अबाधीत राखण्यासह इफ्तार पार्टीचे आयोजन करून ठाकरे दाम्पत्याने समाजापुढे आदर्श उभा केला आहे.

ठाकरे दाम्पत्याने उभा केला आदर्श
पोलिस दप्तरी संवेदनशील अशी ओळख असलेल्या रावेर तालुक्यातील निंभोरा या छोट्याशा गावातील रहिवासी असलेल्या व जनसंग्राम संघटनेचे संस्थापक व माजी उपसरपंच विवेक ठाकरे व त्यांच्या पत्नी मनीषा ठाकरे या सुमारे 20 वर्षांपासून रमजान महिना आल्यानंतर पवित्र रोजा ठेवून समाजापुढे आदर्श उभा करीत आहेत. आई-वडिलांकडून लहानपणीच मिळालेल्या शिकवणीनंतर ठाकरे यांनी जातीवादाचा कधीही स्पर्श होवू दिला नाही. वयाच्या 24 व्या वर्षांपासून नियमाने पवित्र रमजान पर्वात 26-27 असे दोन रोजे सुरू केले आज याला तब्बल 20 वर्ष पूर्ण झाले आहेत तर पत्नी मनीषा यांनीदेखील 15 वर्षांपासून रोजा करीत असून त्यांनी आदर्श समाजापुढे ठेवला आहे. रमजान महिन्यात रोजे ठेवण्यासोबतच ईद व मोहरम हे सण ठाकरे कुटुंबीय साजरे करतात.

समाजोपयोगी उपक्रमाने ठाकरे कुटुंबीय चर्चेत
2013 साली विवेक ठाकरे यांनी आपल्या आईच्या प्रथमवर्षं स्मृतीप्रित्यर्थ निंभोरा येथे हभप संजय महाराज पाचपोळ सर्वात मोठा मातृसमूर्ती किर्तन सोहळयाचे व गावभोजनाचे आयोजन केले हेाते तसेच आपल्या 101 नित्यदर्शन वारी निमित्त शिरसाळा मारोती येथे हभप शिवदास महाराज यांचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले शिवाय हिंदू-मुस्लिम व एस.सी-एस.टी समाजातील गुणवंतांचा दरवर्षी गुणगौरव आणि ‘एक वही मोलाची’ या उपक्रमातून होतकरू व गरजूंना दरवर्षी वह्या वाटप असे अनेकविध व समाजोपयोगी कार्यक्रम या दाम्पत्याच्या नावावर आहे. राजकीय अभिनिवेष बाजूला सारून सामाजिक एकात्मतेच्या भावनेतून राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांच्या नावाने समाजात कार्यरत विविध संस्था व 60 व्यक्तीना नुकताच फैजपूर येथे लोकमित्र सन्मान सोहळा आयोजित करून बहुजन एकात्मतेसाठी कार्यरत सर्वांची मजबूत शृंखला ठाकरे दाम्पत्याने तयार केली आहे.

रोजा इफ्तार पार्टीत घडले एकतेचे दर्शन
ठाकरे दाम्पत्याकडून रोजेदार बांधवांना इफ्तार म्हणून प्रार्थनास्थळात जेवण दिले जाते मात्र यावर्षी आपल्या घरीच त्यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करून गावातील सर्व समाजातील सर्वांना एकत्र आणून सामाजिक समरसता जोपासली. रमजान पर्वात महत्वाचा मानल्या जाणार्‍या 26 व्या रोजानिमित्त शनिवार, 1 जून रोजी आयोजित या कार्यक्रमात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, प्रल्हाद बोंडे, ग्रा.पं.सदस्या शबानाबी दस्तगीर पटेल, डॉ.सुधाकर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य मुजाहिद्दीन शेख, रोहिदास ढाके, चिनावल येथील जामा मस्जिदीचे अध्यक्ष इरफान शेख, सुनील कोंडे, रमजूशेठ पटेल, डॉ.महेंद्र भालेराव, फारुख कुट्टीवाले, सुधाकर भंगाळे, दस्तगीर खाटीक, किरण सपकाळे, गफ्फार पटेल, शाकिर खाटीक, सुनील सुतार, शोएब खाटीक, रोहिदास कोळी, कॉन्स्टेबल सुनील वराडे, अमोल चौधरी, मनिषा ठाकरे, सुजान दिलशाद खान, उत्तम बारी, निलेश भंगाळे, ईसाक पटेल, गौरव ठाकरे आदी सहभागी झाले होते.