भुसावळ। शहरात गेल्या आठवड्यापासून विज भारनियमन वाढले आहे, मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना असल्याने या काळात महावितरणने विज भारनियमन बंद करावे, अशी मागणी जनआधारचे नगरसेवक रविंद्र सपकाळे यांनी महावितरणकडे केली आहे. शहरात विज भारनियमन वाढत असल्याने सर्वसामान्य वैतागले आहेत. रविवार किंवा सोमवारपासून मुस्लीम धर्मियांचा रमजान महिना सुरु होत आहे. रमजानमध्ये मुस्लीम समाजबांधवांना पहाटे चार वाजता उठून रोजा अर्थात उपवास ठेवावा लागतो तर रात्री उशिरापर्यंत सामूहिक प्रार्थना सुरु राहतात.
या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने शहरातील मुस्लीम बहुल भागांसह इतर सर्व भागांतील विजपुरवठा सुरळीत ठेवावा, भारनियमन करु नये, अशी मागणी नगरसेवक रविंद्र सपकाळे यांनी महावितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी विक्रम वानखेडे, राहुल सावळे, गजानन निंबाळकर, महेंद्र सपकाळे, आकाश इंगळे आदी उपस्थित होते. महावितरणने या मागणीची दखल घेणे अपेक्षित आहे. महावितरण कार्यालयात नगरसेवक रवींद्र सपकाळे यांनी चर्चा केली.