रमजान काळात पाकिस्तानकडून ६८ दहशतवादी हल्ले

0

नवी दिल्ली : रमजान महिन्याच्या काळात लागू केलेल्या शस्त्रसंधीत ६८ दहशतवादी हल्ले झाले. शस्त्रसंधी लागू करण्यापूर्वीच दोन दहशतवादी घटना घडल्या होत्या. तरीही भारताने धार्मिक भावनांचा आदर करत शस्त्रसंधी लागू केली. मात्र दहशतवाद्यांनी या काळातही घुसखोरी चालूच ठेवली. केंद्र सरकारकडून ‘सस्पेंशन ऑफ ऑपरेशन’ या मिशनअंतर्गत १७ मे २०१८ ला शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. याअंतर्गत दहशतवाद्यांविरोधात चालू असलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ला स्थगिती देण्यात आली होती.

रमजानच्या काळात दहशतवाद्यांकडून हल्ले करण्यात आले, तर भारतीय सुरक्षा बलाकडून सहा ऑपरेशन राबवण्यात आले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये २८ ग्रेनेड हल्ले आणि अकस्मात गोळीबारीच्या २४ घटना घडल्या. तर दहशतवाद्यांनी आठ सर्वसामान्यांवर हल्ला केला, नऊ लुटमारीच्या घटना घडल्या. याशिवाय भारतीय जवानांवर दगडफेकही अनेकदा करण्यात आली. एकूणच शस्त्रसंधीचा भारताचा अनुभव काही फारसा चांगला राहिलेला नाही. अधिकृत आकडेवारी नुसार वर्षभरात पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.

२०१८ मध्ये पहिल्या पाच महिन्यात म्हणजेच जानेवारी ते मे दरम्यान पाकिस्तानकडून १२५२ वेळा शस्त्रसंधी असूनही गोळीबार करण्यात आला. जम्मू-काश्मीर सीमारेषेवर तर पाकिस्तानने तब्बल ३०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. रमजान महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी केंद्रीय गृह मंत्रालयाने मागे घेतली आहे. शस्त्रसंधी लागू असली तरी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर लष्कराकडून लगेच चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते. शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन ऑलआऊट’ सुरु करण्यात आले आहे.