भुसावळ येथे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादन
भुसावळ- रमजान हा परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा महिना असून संयम, त्याग, शांतीचे प्रतीक असल्याचे मत माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. भुसावळ पोलिस विभाग व एमआय तेली इंग्लिश मेडीयम स्कूलतर्फे शुक्रवारी झालेल्या दावत ए इफ्तार कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी खडसे म्हणाले की, मुस्लीम बांधवांच्या रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव या महिन्यात वाढ असतो.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी आमदार संजय सावकारे, अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष जनाब अमीर साहेब, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, पोलिस निरीक्षक देविदास पवार, बाबासाहेब ठोंबे, माजी नगरसेवक शेख साबीर, रहिमोद्दीन शेख, वाजीद शेख, आयोजक तथा पालिकेचे गटनेते मुन्ना तेली आदी उपस्थित होते. आमदार संजय सावकारे म्हणाले की, गेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या मतदानाचा टक्का वाढला. कोणत्याही राजकिय अमिष किंवा प्रलोभनांना बळी न पडता मतदान झाले, असे मत त्यांनी व्यक्त केले. एमआय तेली हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात समाजाच्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. अंत्यत सूत्रबध्द नियोजन या कार्यक्रमातून दिसून आले. मुन्ना तेली यांनी आभार मानले.