पुणे । ‘गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष…, अथर्वशीर्षाचे पठण… आणि ढोल-ताशांच्या गजरात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेतील 2 हजार 160 विद्यार्थ्यांनी शनिवारी शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याचा विक्रम प्रस्थापित केला.आर्टस अॅन्ड क्रिएटिव्हिटी या विभागाअंतर्गत वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने या विक्रमाची नोंद करून मान्यता दिली आहे. संस्थेचे प्रमुख पवन सोलंकी यांनी प्रमाणपत्र शाळेला प्रदान केले. सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, शाळा समितीचे अध्यक्ष दिलीप कोटिभास्कर, मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी, डॉ. एस. एन. कानिटकर, डॉ. सविता केळकर, शिल्पकार अभिजित धोंडाळे यावेळी उपस्थित होते.
दोन हजार पाचशे किलोची माती
या विक्रमासाठी गेल्या आठ दिवसांपासून प्रशालेत तयारी सुरू होती. कला शिक्षक जयंत टोले आणि संदीप माळी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 हजार 500 किलो शाडू माती मळून त्याचे गोळे करण्याचे काम पूर्ण केले. शिल्पकार धोंडाफळे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना गणेश मुर्त्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. शनिवारी सकाळी उत्साहावर्धक वातावरणात गणेश मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले. प्रत्येक वर्गात 60 याप्रमाणे 2160 मुर्त्या तयार करण्यात आल्या. पुढील शनिवारी या मुर्त्या विद्यार्थी घरून रंगवून आणणार आहेत. त्यातील सर्वोत्कृष्ट मुर्तीची शाळेत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मुख्याध्यापिका तिलोतमा रेड्डी यांनी प्रास्ताविक केले. सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन, दीपाली चौगुले यांनी परिचय आणि उपमुख्याध्यापिका स्नेहल कुलकर्णी यांनी आभार मानले.
याबाबत अधिक माहिती देताना रमणबाग शाळेच्या शिक्षिका म्हणाल्या की, लहान मुलांना प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरे करण्याचे धडे मिळण्यासाठी शाळेकडून दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये शाडूच्या मातीने गणपती साकारण्याची स्पर्धा हा देखील एक उपक्रम असतो. दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. यामध्ये प्रथम क्रमांक येणार्या मुलाने तयार केलेलाच गणपती शाळेत बसवला जातो. मातीचा गणपती साकारताना चिमुकल्यामध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे मातीचा गणपती साकारला होता.