भुसावळ : नगरपालिकेचे मावळते नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांनी आपली सुत्रे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांना सुपूर्द करुन आपली रजा घेतली. पालिका कर्मचार्यांतर्फे शुक्रवार 23 रोजी पालिका आवारात निरोप समारंभ घेण्यात आला अतिशय भावनिक वातावरणात सर्व कर्मचारी व नगरसेवकांनी मावळते नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांना निरोप तर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अख्तर पिंजारी यांनी माझ्या सारखा सर्वसाधारण तसेच अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती नगराध्यक्ष होते हि भाग्याची गोष्ट आहे. नगराध्यक्ष झालो तेव्हापासून चांगली कामे करण्याची इच्छा मनात धरुनच मी कामाला सुरुवात केली. माझ्या कार्यकाळात 1 हजार 22 ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र माझे नशिब दुदैर्वी काही अडचणींमुळे ती कामे माझ्या हातून होऊ शकली नसल्याची खंत व्यक्त करीत यापुढे राजकारणाला सोडचिठ्ठी दिल्याचे स्पष्ट केले तसेच मला 26 तारखेपर्यंत वाट पहायची नसून आजच निरेाप समारंभात लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळेंचा संपुर्ण जबाबदारी सोपवित असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी मंचावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, गटनेता किरण कोलते, उल्हास पगारे, प्रमोद नेमाडे होते.
यावेळी पिंजारी म्हणाले की, पालिकेत कर्मचारी संख्या कमी आहे. मात्र मी खुप भाग्यवान असून माझ्या कार्यकाळातच अमृत योजनेसारखी महत्वपूर्ण योजना मंजूर झाली. असे भरपूर कामे मी मंजूर केलीत. त्यांचे उद्घाटन मात्र रमण भोळेंना करावे लागणार असल्याचे सांगितले. यावेळी अख्तर पिंजारी यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी करुन आपले अधिकारी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांना सोपविले. यानंतर नव्याने निवड झालेल्या तसेच माजी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
पिंजारी यांनी केले कुशलतेने कामकाज
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, माणूस आपल्या वर्तनातून सुसंस्कृतपणा दाखवून देतो. गेल्या अडीच वर्षात नगरसेवक म्हणून पालिका सभागृहात प्रत्येक बैठकीत विकासाचे मुद्दे मांडण्यात आले मात्र त्यात अनेक बंधने होती अशा स्थितीतही अख्तर पिंजारी यांनी कुशलतेने कामकाज पार पाडले. त्यांना विकास कामात कुणीही विरोध केला नाही. एकमताने सर्व विषय मंजूर करण्यात आले त्यानुसार पुढेही कामकाज चालविण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच लवकरच भुसावळ शहर विकसीत शहर होणार असून भेदभाव न करता प्रत्येक वॉर्डात कामे केली जातील असा विश्वास देखील भोळे
यांनी व्यक्त केला.
मागच्यांच्या कामातून शहाणे होण्याचा सल्ला
पालिकेत त्रिस्तरीय कर्मचारी वर्ग आहे. बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी येथे आहेत. अशा स्थितीत पालिकेचे कामकाज करणे जिकरीचे आहे. त्यामुळे विकास कामांचे निधी तसेच्या तसे पडून आहेत. ते का पडून आहेत याची कारणमीमांसा नविन टिमला करण्याची गरज आहे. मागच्याच ठेच पुढचा शहणा यावरुन मागील कामाचा अनुभव घ्यावा ज्या नागरिकांनी विश्वासाने मतदान करुन सेवा करण्याची संधी दिली. हि संधी सर्वांनाच मिळत नाही. यश अपयश चालूच असते. त्यामुळे वाद निवडणूकीपुरते मर्यादीत ठेवून शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात विविध योजनांच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यात येणार असून यात लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे. काही योजनांना 80 टक्के सरकार तर 20 टक्के रक्कम पालिकेला भरावी लागते यासाठी वसूली वाढण्याची गरज आहे. 22 कोटी रुपयांची थकबाकी आहे. शेजारील सावदा, फैजपूर, रावेर पालिकेत 99 टक्के वसूली होते मात्र आपल्याकडे का होत नाही यासाठी नागरिकांना प्रबोधन करुन वसूली वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही नवनियुक्त नगरसेवकांना केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी निरोप समारंभास दिपक धांडे, आशिक खान शेरखान, पुरुषोत्तम नारखेडे, प्रा. दिनेश राठी, राजू सुर्यवंशी, वसंत पाटील, महेंद्रसिंग ठाकूर, रविंद्र खरात, संतोष त्र्यंबक चौधरी, प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, राजू खरारे, राजेंद्र आवटे, विक्की बत्रा, रमेश नागराणी, प्रदीष देशमुख, मुकेश गुंजाळ, आरोग्य अधिकारी दारा फालक, बांधकाम विभागाचे प्रविण जोंधळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.