शासकीय कार्यालयातील सर्व धर्माचे देव, देवतांचे प्रतिमा काढाव्यात
पिंपरी : भारतीय संविधानानुसार भारत देश हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार जरूर आहे. आपण आपल्या धर्माचं आचरण चार भिंतींच्या आत करू शकतो. पण ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर सार्वजनिक क्षेत्रात येतो तेव्हा आपण फक्त भारतीय नागरिक आणि संविधानाचे पाईक असतो. त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष पद्धतीनेच राज्यकारभार चालवला पाहिजे. राज्यशासनाने त्याविषयी परिपत्रक काढून सर्व शासकीय कार्यालयातील सर्व धर्मांच्या देवीदेवतांचे फोटो काढून टाकण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याची कडक अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्यासाठी हे फोटो काढून टाकावेत, अशी मागणी रयत विद्यार्थी मंचाच्यावतीने महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तुकाराम मुंडेंनी केली अंमलबजावणी
संविधानुसार आपण शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये तसेच इतर कोणत्याही शासकीय संस्थांमध्ये कोणत्याही धर्माचे शिक्षण सण, उत्सव साजरा करू शकत नाही. आपल्याकडे फोटोंवर कारवाई झाली नाही, परंतु नाशिक महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करून राज्यात धर्मनिरपेक्ष महापालिकेचा आदर्श निर्माण केला आहे.
जातीयवादी भावना येते
या निर्णयाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला खूप गरज आहे. महानगरपालिकेच्या नगरसेवक व अधिकार्यांच्या दालनात अनेक विविध धर्मांच्या देवीदेवतांच्या प्रतिमा आहेत. जेव्हा इतर धर्मीय लोक या अधिकार्यांकडे येतात, तेव्हा लोकांचा त्या अधिकार्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित होतो. तेथे जातीयभावना निर्माण होते.म्हणून पालिकेने संविधानचा आदर करून अंमलबजावणी केली पाहिजे.
विद्यार्थ्यांना मिळेल आदर्श
विद्यार्थ्यांना या देशाचं भविष्य म्हटलं जात. विद्यार्थ्यांच्या बळावर आपण देशाला जगात महासत्ता बनवण्याची स्वप्ने पाहतो. परंतु आज अनेक महापालिकेच्या शाळांमध्ये विविध धर्मांचे शिक्षण दिल जात. अनेक धार्मिक सण, उत्सव साजरे केले जातात. खरेतर हे संविधानुसार अमान्य आहे. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण दिल्यामुळे आजचे तरुण देशाचा नागरिक बनण्यापेक्षा धर्माचे भक्त होऊन बसत आहेत. धर्माधर्माच्या नावाने देशात दंगली घडवल्या जात आहेत. म्हणून महापालिकेला विनंती आहे की महापालिकेच्या अखत्यारीत जेवढ्या शाळा, महाविद्यालये, कार्यालये आहेत त्यांना सूचना देऊन धार्मिक प्रतिमा हटवण्याचे आदेश द्यावेत. फक्त महापुरुषांचे फोटो सरकारी कार्यलयात असावेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने जर हे पाऊल उचललं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशाला आदर्श ठरेल, असेही रयत विद्यार्थी विचार मंचच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.