मुंबई : महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय, हक्काच्या लढ्यात खासदार राजु शेट्टी यांच्यानंतर रविकांत तुपकर यांच्या रूपाने संघटनेला तरूण, दमदार व आक्रमक नेतृत्व मिळाले आहे. स्वाभिमानी संघटनेत सदाभाऊ खोत यांच्या जाण्याने दुफळी पडल्यांनंतर तुपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा देत खासदार शेट्टींबाबत आपली असणारी निष्ठा दाखवून दिली होती. याचेच फलित म्हणजे त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली.
देश व राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजु शेट्टी यांनी लढा उभारल्याने राजकीय वर्तुळात ‘स्वाभिमानी’ चे वर्चस्व वाढले आहे. देशात खासदार शेट्टी तर राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणुन रविकांत तुपकर यांच्याकडे पाहिले जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी अनेक आक्रमक आंदोलने करून त्यांनी केली आहेत. त्यामुळेच विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह संपुर्ण राज्यातील शेतकरी चळवळीत रविकांत तुपकर यांची क्रेझ वाढली आहे.
रविकांत तुपकर हे मागील अनेक वर्षांपासून विदर्भामध्ये संघटना वाढीसाठी काम करत आहेत. संघटनेमध्ये निर्माण झालेल्या यादवीच्या परिस्थितीत देखील त्यांनी कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्यात मिळवलेल्या यशामुळेच त्यांच्यावर पक्षाची राज्याची धुरा सोपविली जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. आगामी निवडणुकीत तुपकरांच्या रूपाने संघटनेला दमदार व आक्रमक नेत्रूत्व देण्यासाठीच पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत खासदार राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष निवड केली आहे.
राज्य प्रवक्तेपदी अनिल पवार यांची निवड
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते अनिल पवार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि पक्षाच्या राज्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शेतीसह विविध विषयांतील अभ्यासू व सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणारे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. यापुर्वी अनिल पवार यांनी १३ वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून राज्यस्तरावर विविध विषयांवरील प्रश्नांची सोडवणूक केलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पक्षावर होणाऱ्या टिकेला उत्तर देणं आणि संघटनेची ध्येयधोरणे लोकांपर्यत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विचार तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम करणार असल्याचे अनिल पवार यांनी सांगितले. राज्य प्रवक्ता म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बाजू प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांकडे मांडण्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रसारमाध्यमध्ये माध्यम समन्वयक म्हणूनही पवार यांना जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याचं खासदार राजू शेट्टी म्हणाले. राज्यस्तरावर प्रवक्तेपदी निवड झाल्याच्या निमित्त खासदार राजू शेट्टी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोफळे, विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.