रविनाचं काय चुकलं?

0

हां रे …क्या सॉलिड है यार अर्णब, क्या डिबेट करता है मुझे भी बडा पसंद है!
ट्रेनच्या एका कोपर्‍यातून तीन चार मुलींचा आवाज येत होता. त्यातलं हे वाक्य ऐकलं आणि मीही त्या मुलींकडे बघू लागले. पत्रकारितेचे सर्व निकष बासनात गुंडाळून ठेवलेला हा पत्रकार माझ्या डोक्यात जातो. पण मुली हल्ली किती स्मार्ट झाल्यात, चक्क राजकारणी पत्रकारावर बोलत आहेत. चूक बोलत आहेत की बरोबर हे नंतर पण महिला जेव्हा राजकारणावर बोलतात तेव्हा मला मनापासून आनंद होतो.

राजीव गांधी यांनी भारतात कॉम्प्युटर आणले आणि माहिती तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड वाढला. स्मार्ट फोन आल्याने ऑर्कुटनंतर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर लोकांच्या मैफिली जमू लागल्या. यात स्त्रियाही मागे राहिल्या नाहीत. आपल्या आवडत्या विषयावर स्त्रीवर्गही मोकळेपणाने व्यक्त होऊ लागला. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचं वारं खर्‍या अर्थाने देशात घुमू लागलं.आज सोशल मीडियावरही अनेक स्त्रिया विविध विषयांवर लिहितात आणि आपली मतं मांडतात, व्यक्त होतात. समाजातील 50 टक्के असलेला स्त्रीवर्ग बोलतोय, आपलं मत मांडतोय ही समाजाच्या वैचारिक अभिसारणासाठी खूप उपयुक्त गोष्ट आहे. स्त्रिया कशाप्रकारे विचार करत आहेत हे जाणून घेण्यासाठी हे आवश्यकही आहे.

त्यामुळेच या मुली जेव्हा अर्णब गोस्वामीबद्दल बोलत होत्या, तेव्हा मला आनंद झाला. राजकारण हे गलिच्छ क्षेत्र! हे क्षेत्र पुरुषी असल्याचे कित्येक स्त्रिया मानतात. मात्र, आपल्या घरातील, स्वयंपाक घरातील आणि बाहेरच्या जगातल्या प्रत्येक गोष्टीवर राजकारणाचा प्रभाव असतो हे त्यांना मान्य आहे आणि त्याचमुळे आता महिला राजकारण या विषयावरही बोलताना दिसतात. मात्र, सोशल मीडियावर एखाद्या स्त्रीने काही राजकीय/सामाजिक घटनेवर लिहिले की, विरोधक अत्यंत खालच्या दर्जाच्या प्रतिक्रिया नोंदवून या स्त्रियांना ट्रोल करत सोशल मीडियावर लिहिण्यास एकाप्रकारे मज्जावच करतात.गुरमेहर सिंग या मुलीने आपल्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारले अशा आशयाच्या पाट्या घेऊन फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले आणि एकच हलकल्लोळ माजला. या मुलीला जीवे मारण्यापासून ते बलात्कार करण्याच्या, हात पाय तोडून टाकण्याच्या धमक्या मिळाल्या. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची ही ऐशीतैशी तर होतीच, पण चूक असो वा बरोबर एखाद्याचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य असे बेबंदशाही आणि गुंडागर्दी करून हिरावून घेणे कितपत योग्य आहे? अशाने स्त्रीवर्ग जो आज सोशल मीडियावर मत मांडतो आहे त्यांची गळचेपी आपण करतो आहोत, संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क आपण बजावण्यास हडेलहप्पी करत नाकारतो आहोत, हेच लोकांच्या गावी नसतं हे खूप भीषण आहे.

कर्नाटक राज्यातील संविधानिक पेचप्रसंगी करोडोंचा घोडेबाजार होणार, अशी अटकळे होतीच, ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांनी ती अटकळे ट्विटरवर बोलून दाखवली आणि सरकारला पाठिंबा देणारे लोक उधळले. शोभा डे यांच्याविरुद्ध बोलताना लोकांनी भारतीय संस्कृती वगैरे चक्क बासनात बांधून ठेवली. फेसबुकवर राजकारणावर लिहिणार्‍या मुग्धा कर्णिक, शेफाली वैद्य या महिलांनादेखील अनेकदा गलिच्छ ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. कविता महाजन, रेणुका खोत या फेमिनिस्ट लेखिकांना हल्लीच खूप वाईट प्रकारे त्रास दिला गेला, विरोधक मुद्दे मांडताना वैचारिक विरोध सोडून वैयक्तिक चिखलफेक करू लागतात तेव्हा हेच का ते भारतीय पुरुष जे स्त्रीला देवता वगैरे मानतात असा प्रश्‍न पडतो.

हल्लीच रविना टंडन या अभिनेत्रीने शेतकरी मोर्चातील आंदोलकांविरोधात लिहिले. जे व्यक्तिशः मला बिल्कूल पटलेलं नाही. तिच्या त्या ट्वीटची चीडही आली. जेव्हा शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतमाल रस्त्याच्या कडेला फेकून दिला जातो किंवा शेतकरी उभ्या पिकात नांगर चालवतो तेव्हा होणारं नुकसान हे या शहरी लोकांच्या, ज्यांना शेतीचं अर्थकारण समजत नाही यांच्या गावीही नसतं. मात्र, आंदोलनात शेतमाल रस्त्यावर फेकला की हे शहरी लोक जागे होतात आणि आंदोलक शेतकरीविरोधात बोलू लागतात. खरे तर ज्या विषयात आपल्याला ज्ञान नाही त्यावर बोलताना अभ्यासपूर्वक बोलायला हवं, म्हणून रविना टंडनच्या ट्वीटबद्दल आक्षेप मलाही आहेच. पण तिच्या मुद्द्याला विरोध करताना भाषिक सौजन्य मात्र लोक विसरले. याबाबत मला निषेधच व्यक्त करावासा वाटतो.

आसिफा बलात्कार प्रकरणावर करीना कपूर, स्वरा भास्कर, सोनम कपूर यांनी जेव्हा सोशल मीडियावर स्टेटमेंट केलं तेव्हाही आणि आता पुन्हा वीरे दी वेडिंग या तिघींचा अभिनय असलेला सिनेमा प्रदर्शित झालेला आहे आणि त्यातील स्वरा भास्कर हिच्या हस्तमैथुनाच्या सीनवरून वादंग माजलंय. स्वराची आई जिने सिनेमा या विषयावर पीएचडी केलेली आहे तिनेही आपल्या मुलीचे, तिच्या भूमिकेचं आणि एकूणच स्त्रीवर्गाच्या कामसुखाबद्दल बोलणं गरजेचं असल्याबद्दल समर्थन केलंय.

भारतीय लोकांना धर्म-जात-संस्कृती या मुद्द्यांना नीटसा विरोध करता येत नाही! त्यात मुद्दा स्त्रीने मांडला असेल की मग ते अजून जोमाने विरोध करत अगदी त्या स्त्रीला जीवे मारण्याच्या, बलात्कार करण्याच्या धमक्या देण्यापर्यंत, तिच्या चारित्र्याच्या चिंध्या करण्यापर्यंत मजल मारतात. विचारांना विचारांनी विरोध करण्याचे शिक्षण भारतीय लोकांना देण्याची नितांत गरज मला आज रोजी जाणवते आहे.

आजची स्त्री स्वतंत्र आणि विचारी आहे. ती जबाबदार तर आहेच, पण या ट्रोलिंगला घाबरून जाणारीही ती नाही. तेव्हा स्वतंत्र माणूस म्हणून या स्त्रीला स्वीकारायचं की तिला त्रास देऊन तिच्या मनातून उतरायचं, हे या ट्रोलभैरवांनी नक्कीच ठरवायला हवंय.सरतेशेवटी, माध्यम असो वा समाजमाध्यम, इथे प्रत्येकालाच आपलं मत मांडण्याचा सार्वभौम अधिकार आहे. मग, मत मांडणारी व्यक्ती कोणत्याही लिंगाची का असेनात… हरेकाच्या मताचा आदर करणं नि जात-धर्म-लिंग यांच्या पलीकडे जाऊन मतांचा आदर करणे, हीच खरी लोकशाही होय आणि म्हणूनच, अर्णब गोस्वामी सॉलिड असला तरीही रविनाचं काय चुकलं?, हा प्रश्‍न आपल्यासमोर उभा राहतोच.

भाषिक सौजन्याची ऐशीतैशी
हल्लीच रविना टंडन या अभिनेत्रीने शेतकरी मोर्चातील आंदोलकांविरोधात लिहिले. जे व्यक्तिशः मला बिल्कूल पटलेलं नाही. तिच्या त्या ट्वीटची चीडही आली. जेव्हा शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतमाल रस्त्याच्या कडेला फेकून दिला जातो किंवा शेतकरी उभ्या पिकात नांगर चालवतो तेव्हा होणारे नुकसान हे या शहरी लोकांच्या, ज्यांना शेतीचे अर्थकारण समजत नाही यांच्या गावीही नसतं. मात्र, आंदोलनात शेतमाल रस्त्यावर फेकला की हे शहरी लोक जागे होतात आणि आंदोलक शेतकरीविरोधात बोलू लागतात. खरे तर ज्या विषयात आपल्याला ज्ञान नाही त्यावर बोलताना अभ्यासपूर्वक बोलायला हवं, म्हणून रविना टंडनच्या ट्वीटबद्दल आक्षेप मलाही आहेच. पण तिच्या मुद्द्याला विरोध करताना भाषिक सौजन्य मात्र लोक विसरले. याबाबत मला निषेधच व्यक्त करावासा वाटतो.

लेखिका – छाया थोरात