रविवारची सुटी गेली रांगेतच!

0

आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी जिवाचे हाल; शेकडो नागरिक वंचितच

पिंपरी-चिंचवड : विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी तसेच शाळा-महाविद्यालयाचे प्रवेश, शिष्यवृत्तीकामी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. अनेक नागरिकांनी वेळोवेळी आवाहन करुनही आधारकार्ड काढलेले नाही. ज्यांनी यापूर्वी आधारकार्ड काढले आहे; त्यांच्या कार्डात असंख्य चुका आहेत. त्यामुळे आता आधारकार्ड काढणे, त्यात दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांची चांगलीच धावपळ उडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशान्वये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्वच क्षेत्रिय कार्यालयात गुरुवार व रविवार हे दोन दिवस आधारकार्ड नोंदणी व दुरुस्तीसाठी विशेष अभियान राबविण्यात आले. परंतु, योग्य नियोजनाचा अभाव, आवश्यक यंत्रसामग्रीचा तुटवडा आणि अभियानाची फसलेली जनजागृती या बाबींमुळे विशेष अभियानाचा मूळ हेतू साध्य झाला नाही. शहरातील हजारो नागरिकांकडे अद्यापही आधारकार्ड नाही. त्यामुळे नव्याने आधार नोंदणी करण्यासाठी रविवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने क्षेत्रिय कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. सकाळी सहा वाजेपासून नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. रविवारची सुटी अनेकांनी रांगेतच घालवली. हाल सहन करुनही शेकडो नागरिक नोंदणीपासून वंचित राहिले.

दोन दिवसात नोंदणी शक्य नाही
शहरातील हजारो नागरिकांकडे आधारकार्ड नाही. त्याचप्रमाणे अनेक नागरिकांच्या आधारकार्डमध्ये नाव, आडनाव, पत्ता, स्पेलिंग मिस्टेक, जन्मतारीख अशा अनेक चुका आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या नागरिकांची केवळ दोन दिवसात नोंदणी तसेच दुरुस्ती करण्याचे काम पूर्ण होणे शक्य नाही. प्रशासनाने आधार नोंदणी तसेच दुरुस्तीच्या कामासाठी मुदत वाढवून दिली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नोंदणी व दुरुस्तीसाठी येणार्‍या नागरिकांची संख्या लक्षात घेता आवश्यक ती यंत्रसामग्रीदेखील वाढवली पाहिजे. त्यामुळे गोंधळ टाळता येऊ शकतो, असेही काही नागरिकांचे म्हणणे आहे.

नोंदणीसाठी हाताची कामे सोडा!
शहरात नोकरदार कामगार, मजूर यांची संख्या मोठी आहे. आधार नोंदणी व दुरुस्तीच्या कामासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे हाताची कामे सोडून अनेकांना रांगेत उभे रहावे लागले. रविवारी तर दिवसभर रांगेत थांबूनही काम न झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर नाराजी व्यक्त केली. अनेकांनी तर नोंदणीचे काम करणारे अधिकारी व कर्मचार्‍यांना शिव्यांची लाखोलीदेखील वाहिली. रोजगार बुडवून ज्या कामासाठी आलो; तेच काम न झाल्याने नागरिक संताप व्यक्त करताना दिसून आले.

ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांचे हाल
चिंचवड, लिंक रोडवरील ‘ब’ क्षेत्रिय कार्यालयात सकाळी सहापासून नागरिकांची रांगा लावल्या होत्या. सकाळी दहापासून आधार नोंदणी व दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. योग्य नियोजन नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांचे प्रचंड हाल झाले. रांगेत नंबर लावण्यावरून अनेक नागरिकांचे एकमेकांशी खटले उडत होते. महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना भांडणे सोडविताना नाकीनऊ आले होते. नोंदणी व दुरुस्तीचे काम अतिशय संथगतीने होत असल्याने अनेकांनी तासन्तास रांगेत थांबल्यानंतरही काम पूर्ण न करताच घरी परत जाणे पसंत केले.

अनेक जण आले सहकुटुंब
अनेक जण सहकुटुंब क्षेत्रिय कार्यालयात आले होते. दीर्घकाळ रांगेत प्रतीक्षा केल्यानंतर अनेकांनी नोंदणी तसेच दुरुस्तीचे काम पूर्ण केले. अनेक महिला आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन आल्या होत्या. त्याचप्रमाणे अनेक रुग्णदेखील आधार नोंदणीसाठी रांगेत थांबले होते. त्यांचे प्रचंड हाल झाले. काम संथगतीने सुरू असल्याने खूप वेळ रांगेतच थांबावे लागत होते. आपला नंबर जाऊ नये म्हणून अनेकांनी रांगेतच जेवण केले.

तीन मशीन; नागरिक शेकडो
ब क्षेत्रिय कार्यालयात नोंदणी व दुरुस्तीच्या कामासाठी तीनच मशीन ठेवण्यात आली होती. चांगली कनेक्टिव्हिटी असेल तर एका व्यक्तीची संपूर्ण नोंदणी करण्यासाठी साधारणपणे 20 ते 25 मिनिटे लागतात. त्यामुळे एका मशीनवर दिवसभरात केवळ 35 ते 40 जणांची नोंदणी करता येते. तीन मशीनवरून दिवसभरात केवळ 150 ते 160 लोकांची नोंदणी होऊ शकते. अशा परिस्थितीत हजारो नागरिकांची नोंदणी करणे शक्य नाही. तशी कल्पनादेखील प्रभाग कार्यालयातील प्रशासन अधिकार्‍यांनी रांगेत थांबणार्‍या नागरिकांना दिली होती. परंतु, तरीही नागरिक रांगेत गर्दी करत होते. गर्दी लक्षात घेता अजून एक मशीन मागविण्यात आली होती. परंतु, दुपारी दोनपर्यंत ते मशीन क्षेत्रिय कार्यालयात दाखल झाले नव्हते.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार, हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. ब क्षेत्रिय कार्यालयात सकाळी दहापासून आधार नोंदणी व दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली होती. नोंदणीसाठी आम्हाला कोणतेही लक्ष्य नाही. जेवढे नागरिक येतील; त्यांची नोंदणी करतो. मात्र, चांगली कनेक्टिव्हिटी असेल तर एका व्यक्तीची संपूर्ण नोंदणी करण्यासाठी साधारणपणे 20 ते 25 मिनिटे लागतात. त्यामुळे एका मशीनवर दिवसभरात केवळ 35 ते 40 जणांची नोंदणी होते. तीन मशीनवरून दिवसभरात केवळ 150 ते 160 लोकांची नोंदणी होऊ शकते. अशा परिस्थितीत हजारो नागरिकांची नोंदणी करणे शक्य नाही.
-रवींद्र जाधव, प्रशासन अधिकारी, ब क्षेत्रिय कार्यालय.