रविवारी खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

0
पिंपळे गुरवमधील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात आयोजन
पिंपरी-चिंचवड : खान्देशातून उद्योग, व्यवसायानिमित्त पिंपरी, चिंचवड व पुणे शहरात स्थायिक झालेल्या खान्देश परिवाराने ‘खान्देश सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित केला आहे. खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रिडा मंच (पुणे)तर्फे होणार्‍या या महोत्सवाचा उद्देश खान्देश संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा आहे. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात महोत्सव होईल, अशी माहिती कार्याध्यक्ष पि. के. महाजन यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
सांस्कृतिक शोभायात्रा
सकाळी 11 वाजता पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, अकोल्याचे महापौर विजय आगरवाल, सर्वश्री आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, ज्येष्ठ गीतकार ना. धों. महानोर, ज्येष्ठ पार्श्‍वगायिका उषा मंगेशकर आदी उपस्थित असतील. तत्पुर्वी सकाळी 9 वाजता नवी सांगवीतील डायनासोर गार्डन पासून रंगमंदिरापर्यंत सांस्कृतिक शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
विविध मान्यवरांना पुरस्कार
महोत्सवात पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर (अखिल भारतीय खान्देश कोहिनुर), डॉ. उषा सावंत (जीवन गौरव), अजित चव्हाण (अखिल भारतीय खान्देश भूषण), तसेच काहींना ‘खान्देश रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. दुपारी 1 ते सायंकाळी 5 पर्यंत पारंपारिक भिलाऊ नृत्य, तीन पावली, बारा पावली, कानबाई गौराई गीते, अहिराणी भारुड, गाणी, लोकगीते, लोकनृत्य, छक्कड, पोवाडा, बायजाबाईन सोंग, किल्लनी भाजी कयनानी भाकर, पपेट शो, लगीन गीते, बतावनी याचे सादरीकरण होईल. सायंकाळी 5:30 वाजता हृदयनाथ मंगेशकर यांची ‘आजोळची गाणी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचे संयोजन पंकज निकम, शरद पाटील, शोभा पगारे – धर्मशाळे, सुरेश पाटील, गणेश जगताप, बापू पिंगळे, मोतीलाल भामरे, सुरेश मानमोडे, अभिजीत मानमोडे, छाया भदाणे आदींनी केले आहे.