रविवारी खा.संजय राऊतांच्या उपस्थितीत सेनेची बैठक

0

नंदुरबार । तालुक्यातील रनाळे येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेच्या तालुका पदाधिकार्‍यांची बैठक सहसंपर्क प्रमुख दीपक गवते यांनी घेतली. त्यात नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्‍यांवर खासदार संजय राऊत येत असून ते जिल्ह्यातील शेतकर्‍यांशी सुसंवाद साधणार आहेत. या संदर्भातील माहिती या बैठकीत देण्यात आली. रनाळे येथील शासकीय विश्रामगृहात नंदुरबार तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली.

खासदार राऊत त्यांच्या सोबत ग्रामविकास मंत्री दादा भुसे व सहकारमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित राहतील. या बैठकीत शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करावे, या संदर्भात फॉर्म वितरीत करण्यात आले. तसेच ज्यांनी फॉर्म भरुन त्यांनी 11 तारखेला खासदार संजय राऊत यांना जमा करायचे आहेत. शेतकरी मेळावा संपल्यावर अक्कलकुवा भागातील देहली प्रकल्प येथे जाऊन माहिती घेतील व तेथील सातपुड्यातील आदिवासी बांधवांशी भेटून प्रश्‍न समजून घेतील. या बैठकीला जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे यांनी देखील या मेळाव्याची सविस्तर माहिती दिली. या बैठकीची प्रस्तावना तसेच रुपरेषा कशी असेल? कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने कार्य करावे, या संदर्भात जिल्हा शिवसेना प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र शिंपी यांनी माहिती दिली. या बैठकीत तालुका प्रमुख रमेश पाटील, उपतालुका प्रमुख रवी भाबड, अशोक पाटील, संजय राजपूत, किशोर तांबोळी यांच्यासह ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी, गटगण प्रमुख उपस्थित होते.

शेतकर्‍यांना करणार मार्गदर्शन
या बैठकीला मार्गदर्शन करतांना सहसंपर्क प्रमुख शिवसेना दीपक गवते यांनी सांगितले, की शेतकर्‍यांच्या ग्रामीण कष्टकरींचा प्रश्‍न शिवसेना ताकदीने सोडवील. यासाठी सेनेची भुमिका शेतकर्‍यांच्या बाजुने आहे. या संदर्भात नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रविवार 11 जून रोजी सकाळी 10 वाजता शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.