धुळे-महापालिकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रविवारी २ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुर्वतयारीला वेग देण्यात आला असून इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा येत्या रविवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री दादा भूसे, रोहयो व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार अमरिशभाई पटेल, चंद्रकांत रघुवंशी, अनिल गोटे, डी .एस.अहिरे, कुणाल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. त्यानुषंगाने पूर्वतयारीचे काम सुरू असून नवीन इमारतीच्या समोरील रस्त्यावर असलेला रस्ता दुभाजक तोडून रस्ता सपाट करण्यात आला आहे. तसेच इमारतीवर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.