रविवारी पल्स पोलिओ मोहिम; वैद्यकिय विभागाकडून पाच दिवस मोहिम

0

पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात येत्या रविवारी (दि. 19) पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वैद्यकिय विभागाकडून संपुर्ण तयारी करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त लहान बालकांना लस देण्यात यावी यासाठी शहरामध्ये जनजागृती केली जात आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली. या मोहिमेसाठी महापालिका क्षेत्रात एकूण 797 बूथ, 32 प्रवाशी ठिकाणी बूथ व 71 फिरते बूथ अशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील 2 लाख 62 हजार 504 बालकांना पल्स पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट्ये महापालिकेच्या वतीने ठेवण्यात आले आहे. यासाठी एकूण 2659 मनुष्यबळ, 4858 पथके, 211 पर्यवेक्षक, 55 वैद्यकिय अधिकारी, 16 जिल्हास्तरिय अधिकारी व 17 रात्रपाळीचे अधिकारी अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे.

बुथवरील रविवारच्या कामानंतर शहरात प्रत्येक घरी जाऊन मुलांना पोलिओ डोस दिला की नाही? याची खात्री केली जाणार आहे. ज्या बालकांनी रविवारी डोस घेतला नाही त्यांना घरी हा डोस दिला जाणार असून पुढील पाच दिवस ही मोहिम सुरू ठेवण्यात येणार आहे. या मोहिमेची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचावी यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागृती केली जात आहे. शहरामध्ये फिरत्या रिक्षांमधून प्रचार केला जात आहे. तसेच मंदिर, स्टेशन व इतर सार्वजनिक ठिकाणी पत्रके दिली जात आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे.

या मोहिमेसाठी महापालिका, वैद्यकिय अधिकारी, परिचारिका, अंगणवाडी, सेविका, मदतनीस, वैद्यकिय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आदींचे सहकार्य मिळणार आहे. या मोहिमेस सहकार्य करावे. तसेच प्रत्येक पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.