रविवारी रेरा कायद्या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन

0

जळगाव। बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी (महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेशन क्ट 2017) रेरा हा बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी कायदा करण्यात आला असून, महाराष्ट्र शासनाने 1 मे पासून त्याची अंमलबजावणी केली आहे. हा कायदा लागू झाला असला, तरी प्रत्यक्षात कारवाई ही 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात मार्गदर्शनासाठी रविवारी 23 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

शंभर सदस्यांनाच प्रवेश
जिल्हा पत्रकार संघाच्या पद्मश्री भवरलाल जैन सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट दर्शन आर.जैन हे बिल्डर्सच्या आर्थिक व्यवहारांविषयी आणि ज्येष्ठ विधीज्ञ डॉ.के. बी. वर्मा हे महाराष्ट्र रेरा कायद्यातील महत्वाच्या विषयी मार्गदर्शन करतील. यात प्रथम सहभागी होणार्‍या शंभर सदस्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ओम साई रिअल इस्टेट कन्सल्टन्सीच्या कार्यालयात नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. या बहुप्रतीक्षित कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. विकासकांना कटकटीचे वाटणारे अनेक नियम या कायद्यात असले, तरीही ते ग्राहकांना मात्र दिलासादायक ठरणार आहेत. खोटी आश्वासने देऊन विकासकांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक, मनमानी कारभार या गोष्टींना या कायद्यामुळे चाप बसणार आहे. काय आहेत या कायद्याची ठळक वैशिष्ट्य आणि त्यातून ग्राहकांना नेमके काय फायदे होणार आहेत, याची माहिती देण्यासाठी हे चर्चासत्र आयोजित केल्याचे ओम साई रिअल इस्टेट कन्सल्टन्सीचे संचालक रमेशकुमार मुणोत यांनी सांगितले. कार्यशाळेस शहरातील बिल्डर आणि डेव्हलपर्स यांनी उपस्थित राहावे असे आवाहन ओम साई रिअल इस्टेट कन्सल्टन्सीचे संचालक रमेशकुमार मुणोत आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी यांनी केले आहे.