नवी दिल्ली – एअर इंडियाच्या कर्मचार्याला मारहाण केल्याप्रकरणी वादात सापडलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या बचावासाठी आज शिवसेना लोकसभेत आक्रमक झाली. यामुळे सभागृह तहकूब करावे लागले. यानंतर शिवसेनेचे नेते खासदार अनंत गीते हे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री गजापती यांच्यावर धावून गेले.
दरम्यान, खासदार गायकवाड यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत त्या कर्मचार्याने आपल्यावर प्रथम हात उगारला, आपली कॉलर पकडून ढकलून दिले, आपण केवळ त्याचा प्रतिकार केला, असे खासदार गायकवाड म्हणाले.
मारहाणीनंतर प्रथम संसदेत उपस्थित राहिल्यावर शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी या वादासंबंधी आज लोकसभेत निवदेन केले.
माझ्याकडून लोकसभेचा अवमान झाला असेल, तर मी सभागृहाची माफी मागतो, मात्र एअर इंडियाची माफी मागणार नाही, कारण मी एअर इंडियाच्या कर्मचार्यावर प्रथम हात उचलला नाही. तू खासदार असशील पण पंतप्रधान नाही, असे मला त्या कर्मचार्याने ऐकवले, असे गायकवाड म्हणाले. हवाई प्रवास माझा संविधानिक अधिकार आहे. हवाई कंपन्या माझा अधिकार कसा नाकारू शकतात? असा सवाल गायकवाडांनी विचारला. माझा गुन्हा काय चौकशीशिवाय माझी मीडिया ट्रायल सुरू आहे. पोलिसांनी आपल्यावर खुनाचा प्रयत्न असे गंभीर कलम लावले, इतके कठोर कलम कसे काय लावले गेले, असा सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला. दरम्यान विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावर घातलेली प्रवासबंदी उठवली नाही, तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही, असा थेट इशाराच शिवसेना खासदारांनी दिला.
खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणात कायदा आपलं काम करेल. सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असे सांगत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी बंदी हटवण्यात नकार दिला. त्यावेळी प्रचंड गदारोळ झाला. विमान प्रवास बंदी कुठल्या कायद्यात बसते, अशी विचारणा करत शिवसेनेचे खासदार प्रचंड आक्रमक झाले. त्यावेळी शिवसेनेचे नेते अनंत गीते हे केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर धावून गेले. मात्र, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती हाताळली.