देवेंद्र शहा खूनप्रकरण
पुणे : प्रभात रस्त्यावर गेल्या शनिवारी रात्री बांधकाम व्यावसायिक देवेंद्र शहा यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करणार्या दोघा हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहेे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आठ दिवसांपासून डेक्कन पोलीस तसेच गुन्हे शाखेची विविध पथके या दोघांच्या मागावर होती. अगदी मध्य प्रदेशापासून राज्याच्या विविध शहरात शोध घेण्यात येत होता. डेक्कन पोलीस ठाण्याचे एक पथक मध्य प्रदेशात गेले होते. या तपासाची माहिती इतरांना समजू नये, यासाठी पथकातील अधिकारी व कर्मचार्यांकडील मोबाईल बंद करायला सांगून त्यांच्याकडे दुसरे मोबाईल देण्यात आले होते. अतिशय खबरदारी घेत हल्लेखोरांपैकी रवींद्र चोरगे याला ताब्यात घेण्यात यश आले आहे.
राहुल शिवतारे अद्यापही फरार
बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची हत्या करताना प्रभात रोडवरील सायली अपार्टमेंटमधील सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोरांचे फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्यातून त्या दोघांची नावे रवींद्र चोरगे आणि राहुल शिवतारे अशी असल्याचे समजले होते. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यातील रवींद्र चोरगे याच्यावर यापूर्वी मारामारीच्या गुन्ह्यांची नोंद असून राहुल शिवतारेविरोधात ग्रामीण पोलिसांकडे खुनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच खडक पोलिसांनी त्याला एका प्रकरणात यापूर्वी अटक केल्याचे समजते. दोघेही हल्लेखोर हे पूर्वी नवी पेठेत राहत होते. अद्याप राहुल शिवतारे फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.
पैशाच्या वादातून हत्या
पुणे जिल्ह्यासह अहमदनगर, सोलापूर, सांगली व मुंबई या भागात पुणे गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकासह डेक्कन जीमखाना पोलिसांची तब्बल 14 पथके तपास करत आहेत. मुंबईतील अंडरवर्ल्डशी निगडीत काही गुंडांशी या दोघांचे संबंध असल्याची माहितीही पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शहा यांच्या हत्येमुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमधील बिल्डर लॉबी चांगलीच हादरली असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शहा यांनी या दोघांना ठरविलेले कमिशन वेळेवर दिले नव्हते. तसेच, कमिशनमध्येही वाढ करत नव्हते, या वादातून ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. या दोन्हीही आरोपींना पैशाची तातडीने गरज होती. तसेच, दोघापैकी एकाची पत्नी काही महिन्यापूर्वीच बाळंत झाली होती, असेही पोलिस सूत्राने सांगितले.