रवी शास्त्रींची भूमिका काय असणार?

0

मुंबई ।  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आक्रमक, दुरदर्शीपणा आणि बिनधास्तपणासाठी क्रिकेट जगतात मशहूर आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक निवडतानाही त्याने दूरदर्शीपणा दाखवला आहे. सौरव गांगुलीचे पारडे काहीसे वीरेंद्र सेहवागच्या बाजुने झुकलेले होते. पण, सेहवाग संघाचे माजी डायरेक्टर रवी शास्त्री यांच्या तुलनेत मागे पडल्यावर गांगुलीने नवीन प्रशिक्षक आणि कर्णधार विराट कोहलीला मनमानीपणा करता येणार नाही असा डाव खेळला. गांगुलीने शास्त्री यांच्यासह परदेश दौर्‍यावर फलंदाजीसाठी राहुल द्रविड, गोलंदाजीसाठी झहीर खान यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली. याशिवाय आगामी विश्‍वचषक स्पर्धेची तयारी लक्षात घेता संघासाठी क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक, फलंदाजीचा प्रशिक्षक नेमण्यात आला आहे. याचाच अर्थ विश्‍वचषक स्पर्धेच्या तयारी काही उणीव राहू नये असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. पण एवढ्या सगळ्या नेमणुका पाहिल्यावर रवी शास्त्री यांची भूमिका काय असणार असा प्रश्‍न उपस्थित होतोच?.

अनिल कुंबळेच्या तुलनेत रवी शास्त्री संघातीला खेळाडूंशी मोकळेपणाने वागतात असे बोलले जाते. खेळाडूंना प्रोत्साहन देताना शास्त्री मागे हटत नाही. आगामी विश्‍वचषक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर विराट कोहलीच्या युवा संघाला शास्त्री सारख्या प्रशिक्षकाची गरज असल्याचे बीसीसीआयमधील काही पदाधिकार्‍यांचे मत आहे. त्यामुळे एखाद्या फुटबॉल मैदानात संघाचे मॅनेजर खेळाडूंना प्रोत्साहीत करत असल्याचे पहायला मिळते, शास्त्री पण त्याच भूमिकेत पहायला मिळण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय समितीकडून शाबासकी
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या क्रिकेट प्रशासकीय समितीने रवी शास्त्रीला प्रशिक्षकपदासाठी निवडल्याबद्दल गांगुली, तेंडुलकर आणि लक्ष्मणला शाबासकी दिली आहे. क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षक कसा असावा याकरता सूचना केल्या आहेत. प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा सर्वतोपरी विचार करुन निवड केली आहे. सल्लागार समितीने दिलेल्या सेवेबद्दल आम्ही आभारी आहोत, त्यांच्या सूचना अमलात आणल्या जातील असे प्रशासकीय समितीच्या पत्रकात म्हटले आहे.

कोहली जिंकला, क्रिकेट हरले
रवी शास्त्री यांच्या नावावर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केल्यावर समाज माध्यमांवरही भारतीय क्रिकेटप्रेमींनी आपापल्या प्रतिक्रीया दिल्या आहे. अनेक क्रिकेटप्रेमींनी रवी शास्त्री यांच्या नेमणूकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बहुतेक क्रिकेटप्रेमींनी शेवटी कोहली जिंकला, पाहिजे होता तोच प्रशिक्षक त्याने नेमला अशी प्रतिक्रिया दिली. काही क्रिकेटप्रेमींनी संघात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणासाठी वेगवेगळे प्रशिक्षक आहेत. मग शास्त्री संघासोबत नुसते पर्यटन करणार का? असा सवाल विचारला आहे.