नवी दिल्ली । बीसीसीआयने एका विशेष बैठकीच्या माध्यमातून भारत अरुण यांची भारतीय संघाच्या गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. याशिवाय संजय बांगर हे संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असतील असे यावेळी जाहीर करण्यात आले. या दोघांची नावे जाहीर करताना बीसीसीआयच्या पदाधिकार्यांनी झहीर खान आणि राहुल द्रविडच्या नावाचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे या दोघांचा पत्ता कट झाला असल्याचे स्पष्ट झाले. इंग्लंडमध्ये 2019 मध्ये होणार्या आयसीसी विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेपर्यंत शास्त्री आणि त्यांचा सहयोगी स्टाफ संघासोबत असणार आहे.
मंगळवारी राहुल जौहरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित शास्त्री यांच्या सहयोगी स्टाफबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत डायना एडलजी, सी. के. खन्ना आणि अमिताभ चौधरी सहभागी झाले होते. रवी शास्त्री यांना आपल्या रणनीतीनुसार काम करता यावे म्हणून त्यांना सहयोगी स्टाफ निवडण्याची मुभा देण्यात आली.
महान फलंदाज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण या तिघांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची भारतीय संघाचा गोलंदाजीचा सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. पण झहीरच्या नियुक्तीनंतर वाद निर्माण झाला होता. संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना आपल्या मर्जीतला सहयोगी स्टाफ हवा होता. त्यासाठी त्यांनी झहीरच्या संघातील भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याचवेळी त्यांनी भारत अरुण यांच्या नावाचा आग्रह गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी धरला होता.