मुंबई। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची क्रिकेट सल्लागार समिती संघाचा मुख्य प्रशिक्शक निवडण्यासाठी भेटणार आहे. प्रशिक्षकपदासाठी भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटूंनी अर्ज केले आहेत. या अर्जांमध्ये दोन प्रमुख अर्ज आहेत ते रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग यांचे. माजी कर्णधार सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गज खेळाडूंचे पाठबळ असल्यामुळे प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत शास्त्री यांचे नाव आघाडीवर आहे. अस असतानाही क्रिकेट सल्लागार समितीला एका अर्जाचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. हा अर्ज आहे याआधी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार्या लालचंद राजपूत यांचा. लालचंद रजपूत यांनी प्रशिक्षकपद स्विकारले तो काळ भारतीय क्रिकेटमधील भयंकर असा होता. 2007 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील लाजीरवाण्या कामगिरीनंतर ग्रेग चॅपेल प्रशिक्षकपदावरुन पायउतार झाले होते. त्यात पहिली टी 20 क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत रंगणार होती. भारतीय संघाला प्रशिक्षक नव्हता. अशापरिस्थितीत बीसीसीआयने सोपवलेल्या जबाबदारी, एक आव्हान म्हणून स्विकारत लालचंद रजपूत यांनी भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. टी 20 क्रिकेटला जबरदस्त विरोध करणार्या भारताने अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवून पहिला टी 20 क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.
प्रशिक्षक निवडीवरुन रजपुत म्हणाले की, संघाच्या प्रशिक्शकपदी कोणाला निवडायचे हा बीसीसीआय आणि क्रिकेट सल्लागार समितीचा प्रश्न आहे. प्रशिक्शक म्हणून माझी कामगिरी काय होती हे सगळ्यांना माहित आहे. 2007 मध्ये ते दाखवून दिले आहे. रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग यांच्याशी माझी स्पर्धा नाही. त्यामुळे या पदासाठी कोण सर्वात जास्त लायक आहे हे सल्लागार समितीलाच ठरवू दे. त्यांना जर मी योग्य वाटत असेल तर माझी निवड होईल. शेवटी काय, भारतीय संघ जिंकत राहावा अशीच सगळ्यांची इच्छा आहे.
सगळ्यांना एकत्र केल
2007 मधील विश्वचषक स्पर्धेच्या आठवणींना लालचंद रजपूत यांनी उजाळा दिला. ग्रेग चॅपेल यांच्या कार्यपद्धतीमुळे भारतीय संघात गोंधळाचे वातावरण होते. अशापरिस्थितीत माझ्यापुढे संघातील खेळाडूंना एकत्र आणायचे होते. वेळ कमी होता. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आव्हान होते. आपले खेळाडू गुणवान होते. मोठ्या स्पर्धांमध्ये कसे खेळायचे याची त्यांना माहिती होती. त्यामुळे नंतर काही अडचण आली नाही. मोठ्या रुबाबात आपण विश्वचषक जिंकला. असे रजपुत म्हणाले.