मॉस्को : सोची विमानतळावरून उड्डाण करून सीरियाकडे निघालेले रशियन लष्कराचे विमान टीयू-154 बेपत्ता झाले होते. हे बेपत्ता विमान काळ्या समुद्रात कोसळल्याचे नंतर रशियन संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमसोबतचा संपर्क तुटला. शोधपथकांना काळ्या समुद्रामध्ये बेपत्ता विमानाचे अवशेष दिसून आले आहेत. विमानात 8 क्रू मेंबरसह 92 प्रवासी होते. यापैकी काही सेनेच्या रेड आर्मी चोईर या संगीत पथकाचे सदस्य, काही पत्रकार व सैनिक होते. सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश रशियन सरकाने दिले आहेत. संरक्षण मंत्रालयाने विमानाचा शोध घेण्यासाठी शोधपथकांना विमान ज्या ठिकाणी कोसळले तेथे पाठवले आहे. प्रथम विमान क्रासनोडर भागातील डोंगराळ भागात कोसळल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने रशियन प्रसिध्दी माध्यमांनी विमान कोसळल्याचे वृत्त दिले. दुर्घटनेनंतर रशियाचे उप संरक्षण मंत्री पॉवेल पोपोव हे एडलर येथे पोहोचले. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनाही घटनेची माहिती देण्यात आली.
उड्डाणानंतर 20 मिनिटांत विमान बेपत्ता
लष्कराचे टीयू-154 हे विमान चाक्लोव्हस्कीहून सोची येथे इंधन भरण्यासाठी आले होते. त्यानंतर टीयू-154 विमानाने सोची एडलर विमानतळावरून पहाटे 5.00 वाजता सीरियाला जाण्यासाठी उड्डाण केले आणि उड्डाणानंतर अवघ्या 20 मिनिटांत म्हणजे स्थानिक वेळेनुसार पहाटे 5.20 वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल रुमशी संपर्क तुटला. विमान बेपत्ता झाल्याचे समजताच शोध घेण्यार्या हेलिकॉप्टरला सोची शहराजवळ काळ्या समुद्रात विमानाचे काही अवशेष दिसून आले. यावरून विमान कोसळल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाने नंतर प्रसिध्दी माध्यमांना सांगितले.
नाताळ, नववर्षाच्या जल्लोषावर विरजन
दरम्यान, शोधपथकाने समुद्रातून एक मृतदेहदेखील बाहेर काढला. रशियन संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोची शहरापासून सुमारे एक मैलावर समुद्रात पन्नास ते सत्तर मीटरवर या लष्करी विमानाचे काही अवशेष शोधपथकाला दिसून आले. समुद्र किनार्याला वाहून आलेले प्रवाशांचे सामानही शोधपथकांना सापडले आहे. फेडरल एअर ट्रान्सपोर्ट एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, विमानात आठ क्रू मेंबरसह 92 प्रवासी होते. सीरियातील रशियन तळावर नाताळ व नवर्षाच्या कार्यक्रमासाठी निघालेले सैन्याच्या रेड आर्मी चोईर या संगीत पथकाचे सदस्य, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार व सैनिक असे व क्रू मेंबर्ससह 92 प्रवाशांचा समावेश होता.