मॉस्को : जगातील शक्तिशाली नेते म्हणून परिचित असलेल्या व्लादिमीर पुतिन यांची पुन्हा एकदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवड झाली आहे. स्टॅलिन यांच्या तीन दशकाच्या नेतृत्वाच्या दिशेने पुतिन यांची वाटचाल सुरू असून, स्टॅलिन यांच्यानंतरचे ते सर्वाधिक काळ सत्ताधीशपदावरील नेते ठरले आहेत. पुतिन यांच्याशिवाय अन्य सात उमेदवार या निवडणुकीत उतरले होते. रशियामध्ये रविवारी या निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र, गेली दोन दशके रशियातील राजकारण व जनमाणसावर प्रभाव टाकणार्या पुतिन यांनी तब्बल 73.9 टक्के मतांच्या फरकाने आपल्या विरोधकांवर एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे आता आणखी सहा वर्षांचा कार्यकाल त्यांना मिळणार आहे.
पोलादी पकड पुन्हा एकदा सिद्ध
पुतिन यांची कार्यशैली पाहता त्यांना हुकूमशहा असे म्हटले जाते आणि म्हणूनच मतदानादरम्यान मतदारांमध्ये काहीसा निरूत्साह दिसून आला होता, असे दावे रशियातील राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. परंतु, पुतिन यांनी पुन्हा एकदा निर्विवाद विजय मिळवून आपली पोलादी पकड सिद्ध केली आहे. स्टॅलिन हे तब्बल 30 वर्षे रशियाच्या सर्वोच्चपदावर होते. हुकूमशहा अशी ओळख असलेल्या स्टॅलिन यांच्या तीन दशकाच्या नेतृत्वाच्या दिशेने पुतिन यांची वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. पुतीन हे 2000 मध्ये सर्वप्रथम अध्यक्ष म्हणून निवडून आले. दोन टर्म पूर्ण केल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले. या काळात त्यांचे समर्थक दिमित्री मेदवेदेव हे राष्ट्रध्यक्ष होते. मात्र, त्यानंतर पुन्हा पुतिन अध्यक्ष झाले व घटनादुरुस्ती करीत आपला एकचालकानुवर्तित्वाचा खुंटा त्यांनी बळकट केला.