सेंट पीटर्सबर्ग। रशिया भारताला एस-400 मिसाइल सुरक्षा यंत्रणा देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती ब्लादीमर पुतिन यांच्यात झालेल्या भेटीनंतर रशीयाचे उप पंतप्रधान दिमित्री रोगोजीन यांनी ही घोषणा केली. ही यंत्रणा खरेदी करण्यासाठी भारताने रशियाशी सुमारे 39,000 कोटी रुपयांचा करार केला आहे. जगातील सर्वात खतरनाक मिसाइल यंत्रणा म्हणून एस 400 प्रणालीचा उल्लेख केला जातो. 2015 मध्ये तुर्कस्थानने रशियाचे लढाऊ जेट विमान पाडले होते त्यावेळी सीरियाच्या सीमेवर सर्वात शक्तिशाली असलेल्या मिसाइल एस-400 प्रणाली तैनात करण्याची घोषणा रशियाने केली होती. या मिसाइलला ट्रिम्फ या नावानेदेखील ओळखले जाते. या यंत्रणेमुळे एकाच वेळी 36 मिसाइलचा लक्ष्यभेद करता येतो. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनकडून होणार्या हल्ल्याच्या वेळी या यत्रंणेचा प्रभावी वापर करता येणार आहे. ही सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याबाबत गेले वर्षभर भारत आणि रशीयामध्ये चर्चा सुरू होती. रशियाकडून होकार येताच या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मागील वर्षी गोव्यात झालेल्या ब्रिक्स संमेलनादरम्यान 32 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचे सुरक्षा करार करण्यात आले होते. या करारानुसार भारत रशियाकडून पाच एस-400 मिसाइल विरोधी यंत्रणा आणि 200 कोमाव्ह केए 226 टी हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. रशिया आपल्याला 40 हेलिकॉप्टर देणार असून इतर हेलिकॉप्टर देशातच बनवली जातील.
एस 400 मिसाइलची वैशिष्ट्ये
एस 400 विमानविरोधी मिसाइल यंत्रणा आहे
एस 400 रशियाच्या नवीन हवाई सुरक्षेचा भाग आहे. 2007 मध्ये या यंत्रणेचा रशियाच्या सैन्यदलात समावेश करण्यात आला.
या यंत्रणेमुळे विमाने, क्रूझ आणि बॅलेस्टिक मिसाइल्स आणि जमिनीवरील लक्ष्याचा भेद करता येतो.
ही मिसाइल 400 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करु शकते. अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ विमान एफ-35 चा भेद करण्याची क्षमता आहे.
या यंत्रणेतून एकाच वेळी तीन मिसाईल डागता येतात
या यत्रंणेच्या माध्यमातून ड्रोनपासून मिसाइलपर्यंत कुठलाही हवाई हल्ला परतवून लावता येतो.
एक प्रकारचे मिसाइल शिल्ड असून पाकिस्तान किंवा चीनच्या परमाणू बॅलेस्टिक मिसाइल हल्ल्यापासून बचाव करतो.
रडारही पकडू शकत नाही
एस 400 मिसाइल यंत्रणेला रडारही टिपू शकत नाही. रशीयाच्या एस 400 यंत्रणेत वेगवेगळ्या पद्धतीची तीन मिसाइल्स कार्यरत आहेत.
चीनकडेही आहेत
चीननेदेखील सुमारे 3 अब्ज डॉलर्समध्ये रशियाकडून ही यंत्रणा खरेदी केली आहे. रशियाच्या अल्माज सेंट्रल डिझाइन ब्युरोने 1990 मध्ये तयार केले. त्यानंतर त्यात त्यांनी अनेक बदल केले आहेत.