मॉस्को । रशिया सरकारने एक अतिशय अजब असा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण रशियांत रोष व्यक्त केला जातो आहे. रशिया सरकारने त्यांच्या देशातील सर्व अल्पवयीन मुलींची कौमार्य चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचे आरोग्य मंत्री व्लादिमीर शूलड्याकोव यांनी डॉक्टरांना 16 वर्षांखालील सर्व मुलींची कौमार्य चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. रशियाच्या इनव्हेस्टिगेटिव्ह समितीने 16 वर्षांखालील मुलींच्या लैंगिक सक्रियतेबद्दल पुरावे गोळा करण्यास सांगितले आहे. द इंडिपेंडेंटने या निर्णयाबाबतचे वृत्त दिले आहे.
जनतेत रोष, डॉक्टरही निर्णयावर नाराज
मुलींच्या कौमार्य चाचणीच्या या आदेशामुळे रशियातील जनतेमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर डॉक्टरांपासून राजकारण्यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे घाबरून किशोरावस्थेत असलेल्या मुली गरज असतानाही डॉक्टरांकडे जाणार नाहीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांना द्यावी लागणार माहिती
रशियन जनतेला या आदेशाचं पालन करावेच लागेल, असे रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नाहीतर कौमार्य चाचणीची सर्व माहिती तसेच याशिवाय गर्भपात, आणि गर्भधारणेबद्दलची सर्व माहिती पोलिसांना दिली जावी, असेही त्यांनी दिलेल्या आदेशात सांगण्यात आले आहे.
जगभरात पडसाद उमटू शकतात
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच रशियामध्ये घरगुती हिंसेला गुन्ह्याच्या श्रेणीतून हटवण्यात आले होते. त्यानंतर जगभरातून रशियावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे कौमार्य चाचणीच्या या निर्णयाचेही जगभरात पडसाद उमटून रशियाला पुन्हा एकदा टीकेचे धनी व्हावे लागणार आहे, असे चित्र आहे.