रसलपूरच्या बेपत्ता तरुणाचा अखेर मृतदेह आढळला

0

रावेर- तालुक्यातील रसलपूर येथील शांताराम शिवदास चौधरी (24) या बेपत्ता तरुणाचा मृतदेहच मंगळवारी सायंकाळी आढळल्याने रसलपूर गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी या तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

तरुणाच्या मृत्यूबाबत तर्क-वितर्क
हा तरुण आपल्या सात मित्रांसह शिरवेल (मध्य प्रदेश) येथे महादेव दर्शनासाठी रविवारी गेला होता मात्र हा तरुण घरी न परतल्याने तरुणाच्या आई-वडिलांनी सोमवारी सायंकाळी सात वाजता रावेर पोलिसांकडे तोंडी तक्रार केली होती. शांतारामसोबत जिवलग मित्रांकडूनही माहिती मिळत नसल्याने कुटुंबियांनी पोलिसात कायदेशीर तक्रार दाखल करण्याची मागणी केली मात्र घटनास्थळ हे मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा पोलिस ठाण्यात येत असल्याने पोलिसांनी तेथे जावून तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला होता. तरुणाचा शोध सुरू असतानाच मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास शांतारामचा मृतदेह शिरवेल मंदिरापासून दिड किलोमीटर अंतरावरील नाल्यात आढळला तर याबाबत भगवानपुरा (मध्यप्रदेश) पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे भगवानपुरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर.एस.चव्हाण यांनी म्हणाले. मृतदेह शिरवेल मंदिरापासून दिड किलोमीटर अंतरावरील जंगलातील महादेव नाल्यात मिळून आला. शिरवेल मंदिराजवळील गुफेतुन उगम पावलेल्या कुंदा नदीवर हा नाला असून या नाल्यात कुंदा नदीच्या धबधब्याचे पाणी वाहते. मृतदेहाचे भगवानपुरा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गोयल व डॉ.सोळंके यांनी शवविच्छेदन केले. तपास भगवानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर.एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बी.एस.मोरे करीत आहेत.