रसवंती गृहाच्या घु्ंगरांची खळखळ वाढली

0

डोंबिवली : मार्च पासुन चढलेल्या पा-यामुळे मुंबई ठाणे, नवी मुंबईतील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. उकाड्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी नागरिकांची पावले रसवंतीगृहाकडे वळू लागली आहेत. रोज २०० ते ३०० टन उसाची आवक होऊ लागली आहे. शहाळे, लिंबू व इतर शीतपेयांची मागणीही प्रचंड वाढली आहे.

उन्हाची काहिली वाढली आहे. मुंबई, ठाणे परिसरातील तापमान ३८ ते ४०डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आहे. दिवसा घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. माथाडी व इतर कष्टाची कामे करणाऱ्या नागरिकांना उकाड्याचा खूपच त्रास होऊ लागला आहे. घराबाहेर पडलेले नागरिक असह्य उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी रसवंतीगृहांचा आधार घेऊ लागले आहेत. उसाची मागणी सर्वाधिक वाढली आहे. कल्याण डोंबिवली तसेच आजुबाजुचा सर्व ग्रामीण परिसरात रोज २०० ते ३०० टन ऊस रसवंतीगृहांसाठी लागत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल २० हजार १४ टन उसाची आवक झाली असल्याची माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे शामकांत चौधरी यांनी दिली.. अहमदनगर जिल्ह्यातून लाकडी चरखे घेऊन अनेक शेतकरी मुंबई, ठाणे, नवीमुंबई परिसरात दाखल झाले आहेत. १० ते १५ रुपयांना उसाचा रस विकला जात आहे. उकाड्यामुळे शहाळ्यांनाही मागणी वाढली आहे. दाक्षिणात्य राज्यातून रोज मोठ्या प्रमाणात शहाळ्याची आवक होत आहे. ३० ते ४० रुपयांना शहाळे विकले जात होते. उखाड्यामुळे ही किंमत ५० ते ६० रुपये झाली आहे. शहाळ्यांची मागणी ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. ऊस व शहाळ्याप्रमाणे इतर फळांच्या रसालाही ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे.. मार्केटमध्ये उपलब्ध असणारी कोल्ड्रिंक्स आरोग्यास घातक असल्याचे समोर येऊ लागले आहे. यामुळे नागरिकांनी ऊस, लिंबू व इतर फळांच्या रसाला सर्वाधिक पसंती देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शहरातील सर्वच रसवंतीगृहांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.