भिवंडी । भिवंडी विभागात ताडी विक्रीचा व्यवसाय करणारे शासकीय परवानाधारक 18 दुकानदार आहेत. या दुकानांतून 12 महिने ताडीची विक्री केली जाते. ताडी विक्रेते अधिक नशा येण्यासाठी आणि सतत ताडी पिण्याची सवय लागावी म्हणून ताडीमध्ये विषारी रसायन मिसळून त्याची विक्री करतात. अशा ताडी विक्री दुकानातून ताडीचे नमुने जप्त केले जावेत परीक्षण अहवालानंतर ताडी विक्री करणार्या दुकान मालकावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी तिरमल्लेश व्यंकटेश चिन्नम यांनी ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून केली आहे.
कापड निर्मिती उद्योगात गोरगरीब कामगारांची संख्या अधिक आहे. मेहनतीचे काम संपल्यानंतर कामगार ताडी विक्री दुकानात ताडी पिण्यासाठी जातात. भेसळयुक्त ताडी असल्याने कामगारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन किमान परवानाधारक दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाडी घालाव्यात कारण येथेही भेसळयुक्त ताडी विक्री केली जाते. असा चिन्नम यांचा आरोप आहे. तक्रारीच्या प्रती ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणे पोलीस, आयुक्त यांच्या कार्यालयात सुद्धा दाखल करण्यात आलेल्या आहेत. संबंधित विभागाने कारवाई न केल्यास आपल्याकडे दुसरा पर्याय खुला असल्याचा इशारा चिन्नम यांनी दिला आहे.