अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद व रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखन कार्यशाळेचे उद्घाटन
जळगाव – समाजातील वेगवेगळ्या समस्यांवर भाष्य करताना केवळ मानवी स्वभावातील गुणदोष सांगून रसिकांचे मनोरंजन करण्यापेक्षा त्यांना वास्तवाची जाणिव करून देणे अधिक आवश्यक आहे,असे मत अ.भा.मराठी नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व रोटरी क्लब यांच्यातर्फे ख्यातनाम लेखक प्रेमानंद गज्वी यांच्या लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ समीक्षक महेंद्र सुके, अ.भा.मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हाशाखेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष कॅप्टन मोहन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर शरद भालेराव यांनी ‘बोला गांधी उत्तर द्या’ या स्वलिखीत नाटकाचे नाट्यवाचन केले.प्रास्ताविक सहकार्यवाह योगेश शुक्ल यांनी केले. सूत्रसंचालन संदीप घोरपडे यांनी तर आभार प्रविण पांडे यांनी मानले.
संहिता लेखन महत्वाचे – रोहिणीताई खडसे- खेवलकर
अ.भा.मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे- खेवलकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, वास्तवात घडणार्या घटना आणि त्यातून लेखकांनी शोधलेले नाट्य अधिक प्रकर्षाने पुढे येण्यासाठी अशा लेखन कार्यशाळांची गरज असते. नाटक लिहिण्यापासून ते सादरीकरण होण्यापर्यंत लिहिलेली संहिता ही लेखक आणि कलावंत यांच्यापर्यंत मर्यादित असते. मात्र प्रयोग रुपाने सादर झाल्यानंतर ती प्रेक्षकांना कळते,असे त्या म्हणाल्या.
लिहिण्याचे तंत्र अवगत असावे
कार्यशाळेचे मार्गदर्शक प्रेमानंद गज्वी म्हणाले की, संहितेचा विचार करताना त्या संहितेची मांडणी, विषय व उत्कर्षबिंदू यांची सांगड घालताना लेखकाची जबाबदारी निश्चितच वाढते. प्रेक्षकाला नाटक खोटे वाटू नये यासाठी या कलाप्रकारात लिहिण्याचे तंत्र लेखकाला अवगत असणे आवश्यक आहेच. नवलेखकांनी अनुभवी लेखकांशी चर्चा करून नाटकातील आशय विषयाचे संदर्भ तपासून पाहणे अधिक गरजेचे आहे.