पुणे- लतायुग – शतकाचा सोनेरी स्वर …गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या कारकीर्दीचा सांगीतिक आढावा घेणारा कार्यक्रम रेडिओ एफटीआयआय ९०.४ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
आपल्या सोनेरी सुरांच्या जादूने चंदेरी दुनिया भारून टाकणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना लतायुग – शतकाचा सोनेरी स्वर या दृक्श्राव्य कार्यक्रमाद्वारे ही सांगीतिक मानवंदना भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थेचा रेडिओ विभाग आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आली.
प्रास्ताविकातून उद्देश रेडिओ एफटीआयआयचे संजय चांदेकर यांनी स्पष्ट केला. दूरदर्शन निर्मित एका कार्यक्रमाचा काही अंशही दाखवण्यात आला ज्यात लतादीदींनी आपले मनोगत व्यक्त केले होते आणि विविध संगीतकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यांच्या चित्रसंगीताचा रसास्वाद आणि योगदान याविषयी ज्येष्ठ चित्रपट जाणकार सुलभा तेरणीकर तसेच वंदना कुलकर्णी, उस्मान शेख हे समर्पक रित्या बोलले. लतादीदींच्या गानप्रवासातील रसपूर्ण माहिती बरोबरच “बेबी लता मंगेशकर” या नावाने प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या अगदी पहिल्या मूळ ध्वनिमुद्रिका पण या निमित्ताने रसिकांना पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर लतादीदींची अनेक दुर्मिळ गाणी पण या निमित्ताने रसिकांना ऐकायला मिळाली.
कार्यक्रम सादरकर्त्या अभ्यासकांचा सत्कार राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे निदेशक प्रकाश मगदूम आणि एफटीआयआय च्या टेलिव्हिजन विभागाचे प्रमुख राजेंद्र पाठक यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. आश्विन सोनोने यांनी केले होते.