सात राज्यातील 250 कलाकारांंचा सहभाग
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने आणि नंदकिशोर कल्चरल सोसायटी व नेहरू युवा केंद्र, क्रीडा मंत्रालय यांच्यावतीने सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच कार्यक्रम आहे. बाहेरील राज्यातून आलेले हे कलाकार आपल्याला त्यांची जीवनशैली, त्यांचे नृत्य आदी दाखवून गेले. एक-दोन अपवाद वगळता सर्व नृत्य प्रकार नवीन होते. त्यांचे शब्द, अर्थ कळत नसले तरी सुंदर नृत्याविष्कार पहाता आले. यामुळे शहरातील रसिकांना व कलाकारांना विविध राज्यातील नृत्ये पाहण्याचा लाभ घेता आला. रसिकांना विविध नृत्यांची मेजवानीच मिळाली आहे, असे मत उपमहापौर शैलजा मोरे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात सात राज्यातील मिळून एकूण 250 कलाकारांंनी सहभाग घेतला होता. यावेळी सी.आर.पी.एफ.चे उप कमांडंट सचिन गायकवाड, राज्य निदेशक संध्या देवतळे, मुख्य समन्वयक यशवंत मानखेडकर, कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका अश्विनी बोबडे, नगरसेविका सुलभा उबाळे, पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेेंद्र कपोते, युवा नेते दीपक मोढवे आदी उपस्थित होते. पं. नंदकिशोर यांच्या शिष्यांनी पाहुणे व कलाकारांच्या स्वागतासाठी गणेशवंदना, कथ्थक रंगमंच प्रणाम, तराना, नांदी आदी विविध नृत्य प्रकार सादर केले.
रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
यानंतर पूर्वेकडील राज्यांमधून आलेल्या कलाकारांची नृत्ये सुरू झाली. प्रथम त्रिपुरा राज्यातील कलाकारांनी सुंदर लोकनृत्य सादर केले. मिझोराम राज्यातील कलाकारांनी सरलाम काई व तलंगलाम ही आकर्षक नृत्य सादर केली. तर अरूणाचल प्रदेशातील कलाकारांनी भूरी नाईझीर नृत्य सादर केले. मणिपूर राज्यातील कलाकारांनी अभिसार, खांबाथोईबी, मार्शल आर्टस्, मिटी जागोई अशी विविध नृत्ये सादर केली. या कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. यानंतर नागालँड राज्यातील कलाकारांनी नृत्याद्वारे त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. तर सिक्कीम राज्यातील कलाकारांनी नेपाळी नृत्य व लेपचा नृत्य केले. अशा प्रकारे त्रिपुरा, आसाम, मिझोराम, अरूणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, सिक्किम या सात राज्यातील कलाकारांनी अप्रतिम सौंदर्यपूर्ण नृत्ये सादर करून रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सर्व नृत्यांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यशवंत मानखेडकर, सचिन चिखले, राजेंद्र कपोते, सुलभा उबाळे, दीपक मोढवे पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. नंदकिशोर कपोते यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.