रस्ता अडविणार्‍या बिल्डरला अभियंत्यांनी दिली समज

0

नगरसेवक अमर जैन यांच्याकडे नागरिकांची तक्रार

जळगाव । पिंप्राळा परिसरातील मयुर सोसायटीतील सुमारे ५० महिलांनी आज रस्त्यात बांधकाम साहित्य टाकून गटार तुंबविणा़र्‍या व रस्ता अडविणार्‍या बिल्डर विरोधात एल्गार केला. या महिलांनी नगरसेवक अमर जैन यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जैन यांनी महापालिकेचे अभियंता प्रकाश पाटील यांना घटनास्थळी बोलावून परिस्थिती समजावली व संबंधित बिल्डरला समज द्यायला सांगितले.

महिलांनी घेतलेला पवित्रा पाहता बिल्डरने रस्त्यात पडलेले बांधकाम साहित्य उचलून गटार व रस्ता मोकळा केला. आज दुपारी मयुर सोसायटीत एका खाजगी बांधकामाच्या ठिकाणी गटार बंद झाली होती. बांधकामाचे साहित्य गटारीत गेल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत होते. तेथेच रेती, खडी व तोडलेल्या बांधकामाच्या साहित्याचा ढीगारा टाकल्यामुळे रस्ता देखील बंद झाला होता. लहान मुले, महिला व वृध्दांना रस्त्यांवरुन येण्याजाण्यास अडचण येत होती. हा प्रकार पाहून सोसायटीतील महिलांनी नगरसेवक अमर जैन यांच्याकडे तक्रार केली. नगरसेवक जैन यांनी अभियंता पाटील यांना तात्काळ बोलावून घेत संबंधितास समज देण्याचे सांगितले. त्यानुसार नंतर कार्यवाही झाली. बिल्डरनेही बांधकाम साहित्य हटवून गटार व रस्ता खुला केला.