रस्ता बंद कराल, तर रस्त्यावर उतरू!

0

मुंबई । मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दर मंगळवारी हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे प्रचंड गर्दी होत असते. ही गर्दी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक मार्गच कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दादर पश्चिमेकडील पोर्तुगीज चर्च ते सिद्धिविनायक मंदिर हा एस. के. बोले रोडचा भाग कायमचाच बंद करण्याचा प्रस्ताव दादर वाहतूक पोलिसांनी तयार केला आहे. त्यात रहिवाशांची मते जाणून घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. पण हा मार्ग बंद करण्याला रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा मार्ग बंद केल्यास आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. ही मोहीम 24 जुलैपर्यंत सकाळी 10 ते 12.30 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत चालू राहणार आहे.

सिद्धिविनायक मंदिराकडून एस. के. बोले मार्गाकडे(आगार बाजारच्या दिशेकडील) रस्ता वाहतुकीसाठी बंद करून वीर सावरकर मार्गावरून उजवीकडे काशिनाथ धुरू मार्ग या अरुंद गल्लीत वाहतूक वळवण्यात आली आहे. यामुळे कीर्ती कीर्ती कॉलेजातील व शाळकरी विद्यार्थ्यांना, महिला व ज्येष्ठांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो.
– अनिता माहिमकर, स्थानिक रहिवासी

मंदिर परिसरात स्वाक्षरी मोहीम सुरू, स्थानिक नागरिकांची होतेय गैरसोय
1 मंदिरासमोरील पेट्रोलपंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी लागणारी टॅक्सीची रांग व मंदिरासमोरील शेअर टॅक्सी स्टँडमुळे ही कोंडी होते. फुटपाथदेखील कमी करण्यात आले आहे.
2 त्यामुळे पादचार्‍यांना चालण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही वाहतूककोंडी दूर करण्यासाठी सुरवातीला दादरच्या पोर्तुगीज चर्चकडून उजवीकडे जाणारी एस. के. बोले रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली.
3 त्याचबरोबर मंदिराकडून उजवीकडे आगार बाजाराच्या दिशेने वळणारी वाहतूकही खासगी मोटारींसाठी बंद केली. त्यातच आता हा मार्गच बंद करण्यात येत असल्यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्याला स्थानिकांना विरोध दर्शवला आहे.

मनसेचा ठाम पाठिंबा
या मुद्द्याचे भांडवल करत आता स्थानिक राजकीय पक्ष स्थानिकांच्या मनात स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. तेथील रहिवाशांच्या अडचणी समजून घेत मनसे आता त्यांच्या पाठिशी उभी राहिली आहे. 21 जुलै रोजी सर्व स्थानिक रहिवाशांच्या वतीने निवेदन करण्याकरिता आगर बाजार आणि सिद्धिविनायक मंदिर येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांसह मंदिरात येणार्‍या भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.