रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या मिळकतींवर कारवाई

0

तळेगाव दाभाडे : तळेगाव शहरातील जिजामाता चौक ते घोरावाडी रेल्वे स्टेशन तसेच मारुती मंदिर चौक ते गणपती मंदिर चौकापर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामा मध्ये येणार्‍या मिळकती पाडण्याच्या कामास तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने सुरुवात केली आहे. ही कारवाई करताना तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव आवारे, शहर अभियंता नितीन अनगळ, अमित भोसले, संभाजी भेगडे, रवींद्र काळोखे, प्रवीण माने, विलास वाघमारे, प्रशांत गायकवाड या अधिकायांच्या समवेत कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील मुख्य रस्ते फारच अपुरे पडत असल्याने दररोज तळेगाव नागरिकाना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने नगरपरिषदेने जिजामाता चौक ते घोरावाडी रेल्वे स्टेशन पर्यंत तसेच मारुती मंदिर चौक ते गणपती चौकापर्यंतचे रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे हे रस्ते 9 मीटर रुंदीचे असून दोन्ही बाजूकडून रुंदीकरण होणार आहे.

या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये बाधित होणार्‍या नागरिकांच्या विशेष सभा घेऊन त्यांचे मनपरिवर्तन करण्यात आले आहे. यामध्ये काही नागरिकांनी हे रस्ते त्वरित रुंद करावेत अशी मागणी देखील केली आहे. सध्या रस्त्याचे रुंदीकरण दोन्ही बाजूस करण्यात येत असून एकूण 9 मीटर लांबीचे रुंदीकरण राहणार आहे. मुख्याधिकारी वैभव आवारे आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थिती सुभाष चौकातील रुंदीकरणात बाधित सुभाष मार्केटची भिंत, सार्वजनिक मुतारी, पोलीस स्टेशन भिंत, प्राथमिक आरोग्य केंद्राची भिंत काढून रस्ता रुंदीकरण्याचे कामास प्रारंभ केल्याने नागरीका मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

ज्या मिळकतदरांची कच्ची बांधकामे, टपर्‍या, पत्राशेड, घरा पुढचे ओटे बाधित मिळकतदारांनी स्वतःहून 2 दिवसामध्ये त्वरित काढून घ्यावेत तसेच ज्यांची बांधकामे पक्की असून यामध्ये पिलर वैगरे आहेत ते काढल्यास इमारतीस धोका निर्माण होतो त्या मिळकतदारांनी 15 दिवसाच्या आत करून घ्यावे अन्यथा पुढे कारवाईस सामोरे जावे लागेल. असे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी सांगितले.