अॅम्स्टरडॅम । भारतात रस्ते म्हटलं की खड्डे आलेच. पावसाळ्यात तर रस्त्यांमध्ये चक्क तलाव साचतो. मुंबईत तर कोट्यवधी रुपयांचे टेंडर महापालिका केवळ खड्डे बुजवण्यासाठी काढते. कॉन्ट्रॅक्टर रस्ते बनवतो, मात्र काही दिवसांतच ते रस्ते उखडायला सुरुवात होते. मग काढले जाते रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि डागडुजीसाठीचे टेंडर, यात सर्वांचाच फायदा होत असल्याने त्याला कुणी जास्त आक्षेपही घेत नाही.
नेदरलँडमध्ये मात्र स्वत:च रिपेअर होणारे रस्ते बनविले जात आहेत. न्यूझीलंडच्या डेल्फ्ट विद्यापीठातील डच शास्त्रज्ञ डॉ. एरिक लिन्जेन यांनी हा शोध लावला आहे. असे 12 रस्ते नेदरलँडमध्ये 2010 सालापासून वापरात आहेत व आजही ते उत्तम स्थितीत आहेत. हे रस्ते बनविताना खास प्रकारचे डांबर वापरले गेले असून त्यात बॅक्टेरियांचा वापर केला गेला आहे. नेहमीच्या डांबरपासून बनविलेल्या रस्त्यांत छिद्रे असतात व हे रस्ते उष्णता मोठ्या प्रमाणावर शोषतात. त्यामुळे छिद्रे आणि भेगा रूंद होतात व खड्डे पडतात.
एरिक यांनी रस्त्याचे डांबर बनविताता त्यात स्टील फायबरचा वापर केला आहे व नवीन प्रकारचे डांबर तयार केले आहे. हे डांबर घालून बनविलेल्या रस्त्यांवर इंडक्शन रोलर फिरविला की त्यातील भेगा, खड्डे आपोआप भरून येतात. क्राँकीटवरही त्यांनी असेच प्रयोग केले असून त्यात बॅक्टेरियांचा वापर केला गेला आहे. हे बॅक्टेरिया कॅल्शियम काबरेनेट तयार करतात व त्यामुळे क्रॅक भरून येतात. विशेष म्हणजे हे बॅक्टेरिया 200 वर्षे जिवंत राहू शकतात व त्यांच्यापासून माणसाला कोणताही धोका नसतो. हे डांबर नेहमीच्या डांबराच्या तुलनेत 25 टक्के महाग पडते पण त्यापासून बनलेले रस्ते दीर्घकाळ चांगल्या अवस्थेत राहतात.