रस्ते काँक्रिटीकरण कामासाठी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी

0
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा पुढाकार ; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक आश्‍वासन
भुसावळ:- भुसावळातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने विशेष निधी म्हणून 25 कोटी द्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी केली. या संदर्भात सकारात्मकता मुख्यमंत्र्यांनी दर्शवत लवकरच निधी मंजूर करण्याचे आश्‍वासनही दिले. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, शिक्षण सभापती अ‍ॅड. बोधराज चौधरी उपस्थित होते. शुक्रवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाने भेट घेतली.
निधीबाबत मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक आश्‍वासन
शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामासाठी 25 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरासाठी विशेष निधी उपलब्ध करुन देवू, असे आश्वासन आमदार, नगराध्यक्षांना दिले. या निधीतून शहरातील नाहाटा चौफुली ते बाजारपेठ पोलिस ठाणे तापी रोड ते यावल नाका, महामार्गावरील नवोदय विद्यालय ते गांधी पुतळ्यापर्यंतचा जळगाव रोड, सरदार वल्लभभाई पुतळा ते पांडूरंग टॉकीज रस्ता, बाजारपेठ पोलीस ठाणे ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा व वरणगाव रोडवरील चौफुली पर्यंतचा रोड, डॉ.आंबेडकर पुतळा ते रजा चौक व खडका चौफुली पर्यंतचा खडका रोड, गर्ल्स हायस्कूल ते मुख्य बाजारपेठ व अमर स्टोअर्स पर्यंतचा मिरवणुकीचा मार्ग आदी शहराला जोडणार्‍या सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे.